कोल्हापूर :
देशात आणि राज्यात अनेकवेळा आपत्ती आल्या आहेत. या काळात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत करण्याचे काम केले आहे. अशा संस्थांना आता मदत करण्याची जबाबदारी आपली आहे. नागरीक म्हणून या संस्थांना मदतीचा हात देवूया असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आपत्ती काळात राबविलेल्या बचावकार्याबद्दल जीवन मुक्ती सेवा संस्था, व्हाईट आर्मी यांच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि मानपत्र देवून शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाउसाहेब सभागृहामध्ये हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, सरोज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, प्र–कुलगुरु पी. एस. पाटील, रजिस्टार डॉ. व्ही. एन. शिंदे, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील प्रमुख उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, देशासह राज्यावर आजपर्यंत अनेकवेळा आपत्ती आल्या. यामध्ये प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून बचावकार्य राबविण्याचे काम अनेक सेवाभावी संस्थांनी केले. तिलारी येथे भूकंप झाला त्यावेळी सकाळी 7 वाजता मी घटनास्थळावर पोहोचलो होतो. भूकंप झाल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा 24 तास राबत होती. त्यावेळचे जिल्हाधिकारी बैलगाडीमध्ये झोपले होते.तेथील परिस्थीती खूप विदारक होती. हजारो घरे जमिनदोस्त झाली होती, शेकडो प्रेतं पडली होतील. याकाळात प्रशासनाने राबविलेली बचावकार्य आणि त्यानंतर तेथील जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी यंत्रणेने अहोरात्र कष्ट केले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंगराव यांचा मला फोन आला होता. मी तेथे येतो, मात्र मी त्यांना स्पष्ट शब्दांत येवू नका असे सांगितले. आपण आला तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आपल्यामागे राहिल आणि बचावकार्य थांबू शकते असे सांगितले. यानंतर नरसिंगराव यांनी तिलारी येथे येण्याचे रद्द केले. गुजरात येथील कच्छ आणि भुज भूकंपावेळी तेथे बचावकार्यात जाण्याची संधी मिळाली. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या भूकंपानंतर काही तासातच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलाविली. यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी तिलारीचा अनुभव पाठीशी असल्याने मला पाठविण्याची संधी मिळाली. यावेळी माझ्यासोबत पी. के. मिश्रा नावाचे अधिकारी होते. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा झाला पाहिजे असे सांगितले. यानंतर देशात आपत्ती व्यवस्थापन कायद्या अस्तीत्वात आला.
मुंबई बॉम्बस्फोटामध्ये हिंदू मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता. यावेळी 11 ठिकाणी स्फोट घडले असतानाही महंमद अली रोडवर बॉम्बस्फोट झाल्याचे सांगितले. यामुळे अवघ्या 48 तासांमध्ये मुंबई शांत झाली असल्याचे अनुभव सांगितले.
खासदार शाहू महाराज म्हणाले, राज्यासह देशात आपत्तीवेळी शरद पवार यांनी बचाव कार्यायमध्ये सहभागी होवून प्रशासनाकडून योग्य पद्धतीने काम करवून घेतले. आता तिलारी येथे गेले असता, भूकंप झाला की नाही हे कळत नाही. शरद पवार यांनी तेथेच आपले ऑफीस थाटले असल्याचेही शाहू छत्रपती यांनी सांगितले.
यांना मिळाले पुरस्कार
निवृत्त प्रधान सचिव उमेशचंद्र सारंगी, निवृत्त उपसचिव दत्तात्रय मेतके, मुंबई अग्नीशमन दलाचे निवृत्त अधिकारी हेमंत परब, बृहन्मुंबई महापालिकेचे निवृत्त अधिकारी सुभाष दळवी, आर. डी. पाटील कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, पाटीदार समाज यांना सन्मानित करण्यात आले.
घशाला दुखापत…
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घशाला दुखापत झाली आहे. भाषणादरम्यान वारंवार त्यांना त्रास होत होता. मात्र या स्थितीमध्येही त्यांनी 23 मिनीटे उभारुन भाषण केले. यानंतर मात्र त्यांनी घशाला त्रास होत असल्यामुळे भाषण थांबवत असल्याचे सांगितले.








