► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नेपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण अपघात पिडितांना आर्थिक साहाय्यता करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या अपघातात 27 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त बस उत्तर प्रदेशातील असून बळी बहुतेक सर्व भारतीय नागरीकच आहेत. ते नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते. या अपघातात मृत झालेल्या प्रत्येकाच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची साहाय्यता दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘एक्स’ संदेशात शनिवारी स्पष्ट केले आहे.
दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये बहुतेकजण महाराष्ट्रातील जळगावचे आहेत. या बसमध्ये 40 प्रवासी होते. त्यांच्यापैकी काहीजणांचे प्राण वाचविण्यात आले. एक प्रवासी 500 फूट खोल दरीत पडला होता. त्याला हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले असून तो वाचला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांचा शोकसंदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातासंदर्भात तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना हानी भरपाई देण्याची घोषणाही केली आहे. नेपाळचे नेते के. पी. शर्मा ओली यांनीही शोक व्यक्त केला असून पंतप्रधान मोदी यांना आपल्या भावना कळविल्या आहेत. या बसमध्ये 41 प्रवासी आणि 2 बस कर्मचारी होते. ते सर्व भारतीय होते. बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस मरस्यांगदी नदीत कोसळून किमान 27 भारतीय नागरीक मृत झाले आहेत. काहीजण बेपत्ता असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.









