पशुसंगोपनतर्फे गायीला 20, बैलाला 30 हजार रुपये आर्थिक मदत
प्रतिनिधी/ बेळगाव
लम्पीने दगावलेल्या जनावरांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर झाली आहे. संबंधित शेतकऱयांच्या थेट बँक खात्यावर ही मदत जमा केली जात आहे. त्यामुळे पशुपालकांतून समाधान व्यक्त होत आहे. लम्पीच्या संसर्गाने जनावरे दगावली आहेत. त्यांच्यासाठी ही मदत पशुसंगोपनमार्फत पोहोचविली जात आहे.
मागील दोन महिन्यांपासून तालुक्मयात लम्पी विषाणूजन्य रोगाचा फैलाव सुरु आहे. या संसर्गजन्य रोगाची हजारो जनावरांना लागण झाली आहे. तर शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकऱयांना फटका बसला आहे. दगावलेल्या जनावरांमध्ये गाय, बैल आणि वासरांचा समावेश आहे. काहींच्या दुभत्या गायी दगावल्याने उदरनिर्वाहावर परिणाम झाला आहे. तर काही शेतकऱयांचे बैल दगावल्याने त्यांच्यासमोर शेती कामाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने लम्पीने दगाविलेल्या जनावरांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. यामध्ये बैल दगाविल्यास 30 हजार रुपये, गाय दगाविल्यास 20 हजार रुपये आणि वासरू दगाविल्यास 5 हजार रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जात आहे.
तालुक्मयात 172 हून अधिक जनावरे लम्पीने दगाविली आहेत. अशा जनावर मालकांना येत्या दोन दिवसांत ही मदत दिली जाणार आहे. लम्पीने दगावलेल्या जनावरांची नोंद संबंधीत पशुवैद्यकीय अधिकाऱयांकडे आहे. त्यामुळे दगावलेल्या जनावरांचे फोटो, आधारकार्ड आणि बँक पास बुकच्या माध्यमातून ही मदत दिली जाणार आहे. तालुक्मयात 1 लाख 78 हजार इतकी जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये 80 हजारांहून अधिक गाय, म्हैस आणि बैल आहेत. यामध्ये गाय आणि बैलांना या रोगाची लागण अधिक झाली आहे. दुभती जनावरेदेखील दगावल्याने तालुक्मयातील एकूण दूध उत्पादनावरदेखील परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने लम्पीने दगावलेल्या जनावरांना आर्थिक मदत देवू केली आहे.
बाजारभावाप्रमाणे एका जातीवंत गायीची किंमत 60 ते 70 हजार रुपये आहे. तर शेतात काम करणाऱया बैलजोडीची किंमत देखील 70 ते 80 हजार रुपये आहे. त्या तुलनेत शासनाने बैलासाठी 30 हजार रुपये तर गायीसाठी 20 हजार रुपये ही जाहीर केलेली आर्थिक मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे वाढीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.
प्रतिक्रिया
डॉ. आनंद पाटील ( तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)
लम्पीने जनावर दगावलेल्या शेतकऱयांना आर्थिक मदत दिली जात आहे. शिवाय यामध्ये पारदर्शकता असावी, यासाठी थेट शेतकऱयांच्या बँक खात्यातच मदत जमा केली जात आहे. जनावरे दगावलेल्या सर्व शेतकऱयांना ही मदत मिळणार आहे.









