बेंगळूर : सरकारी कामांसाठी यापुढे हेलिकॉप्टर, विमानसेवा वार्षिक भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे. सोमवारी विधानसौध येथे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत तासांच्या आधारावर हेलिकॉप्टर/विमानसेवा भाडेतत्त्वावर घेतली जात होती. आता तासाऐवजी वार्षिक भाडेतत्त्वावर ही सेवा घेतली जाईल. सरकारी कामे, कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर महनिय व्यक्तीसाठी तासाच्या आधारावर हेलिकॉप्टर भाडे तत्त्वावर घेतले जात होते. यासाठी सरकारी तिजोरीतून 28 कोटी रु. खर्च होत होते. योग्य वेळेत हेलिकॉप्टर सेवा मिळणेही कठीण होत होते. त्यामुळे सरकारने वार्षिक भाडेतत्त्वावर ही सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याकरिता योग्य प्रशिक्षण असणाऱ्या कंपन्यांना टेंडरमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. बैठकीत मंत्री के. जे. जॉर्ज, भैरती सुरेश व इतर अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, हेलिकॉप्टर आणि एअरक्रॉफ्ट भाडेतत्त्वावर घेण्यासंबंधीचा मुद्दा अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर ही जबाबदारी सोपविली होती. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. सोबतही चर्चा करण्यास सांगितले होते. देशव्यापी निविदा मागविण्यात येतील. वरिष्ठ आयएएस अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हेलिकॉप्टर व विमानसेवेचा वापर करतात. विलंब होतो, या कारणाने अनेकदा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सभा-समारंभ घाईगडबडीत संपवून जावे लागल्याची उदाहरणे आहेत. या कारणांमुळे सरकार वार्षिक भाडे तत्वावर हेलिकॉप्टर, विमानसेवा घेणार आहे, असे ते म्हणाले.









