200 जणांना रोजगार मिळणार
पणजी : आपल्या दिल्ली भेटीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी होंडा येथे हेलिकॉप्टर दुरुस्ती प्रकल्प सुरू करण्यावर चर्चा झाली. हा प्रकल्प गोव्यासाठी महत्त्वाचा असून त्यामुळे 200 जणांना रोजगार मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा करण्याची संधी मिळाली. यावेळी राजकीय परिस्थितीवर विचारविनिमय झाला आणि त्यांचे मार्गदर्शन लाभले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी राजधानी पणजी शहरातील संरक्षण दलाच्या ताब्यात असलेली जागा लवकरच राज्य सरकारला मिळणार असल्याचे संकेत दिले. याबाबत संरक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून ती जागा मिळण्याची खात्रीही त्यांनी व्यक्त केली. दिल्ली भेटीवेळी आमदार मायकल लोबोही आपल्यासमवेत होते, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
उद्योगमंत्रालयाचे गोव्यात कार्यालय
केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्या मंत्रालयाचे गोव्यात कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि त्यावर चर्चा झाली. कृषी आणि अन्न उत्पादन निर्यात-विकास प्राधिकरणाची शाखा गोव्यात असावी. त्यामुळे गोव्यातील उद्योग क्षेत्राला फायदा मिळणार आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
गोव्यात औद्योगिक पार्क व्हावे
देशभरात 100 नवीन औद्योगिक पार्क तयार करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्यातील एक पार्क गोवा राज्यात व्हावे, अशी विनंती केंद्राकडे केल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. केंद्रीय मंत्र्यांनी गोव्याच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.









