सांगली जिल्ह्यातील मणेराजूर येथील बैलगाडी शर्यत : पट्टा पद्धतमध्ये ‘लखन-सर्जा’ बैलजोडीला प्रथम क्रमांकाची फॉर्च्युनर कार
सांगली : सांगली जिल्ह्यातील मणेराजूरीच्या कोड्याच्या पाचशे एकर माळरानावर भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार रविवारी रंगला होता. यामध्ये पाच लाख बैलगाडा शर्यतीप्रेमींची उपस्थिती होती.भव्य जनरल व पट्टा पद्धत बैलगाडी शर्यती अश्या दोन गटात यास्पर्धा रविवारी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे पाच हजार स्पर्धक सहभागी झाले होते. सकाळी साडेसहा पासून रात्री बारा वाजेपर्यत या स्पर्धा उत्साहात सुरु होत्या यासाठी लाईटची मोठी व्यवस्था करण्यात आली होती. अतिंम बैलगाड्यांमधून झालेल्या रोमांचक जनरल मैदानी अंतिम फेरीत गटात हेलिकॅप्टर बैजा आणि ब्रेक फेल बाळूदादा हजारे शिरूर (कर्नाटक) व पाटील डेअरीच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत फॉर्च्युनर गाडी मिळवून श्रीनाथ केसरीवर आपले नांव कोरले.
तर द्वितीय क्रमांक जंगम यांच्या बैल जोडीने मिळवून महिंद्रा थार या कारवर आपले नाव कोरले तर तृतीय क्रमांक हरिपूरचा बोंद्रे व बुलेट छब्याने ट्रॅक्टर आपल्या नावावर घेतला. तर पट्टा पद्धतीमध्ये प्रथम क्रमांक छत्रपती संभाजीनगरचा लखन व हिंगोलीचा सर्जा या बैल जोडीने प्रथम क्रमांक मिळवत श्रीनाथ केसरीची फॉर्च्युनर कारचे मानकरी ठरले,तर द्वितीय क्रमांक बुलढाणा जिह्याचा रुद्र या बैल जोडीने महिंद्रा थार या कारवर आपले नाव कोरले. तर तृतीय क्रमांक कल्याणचे राहुल पाटील यांचा मथुर बैल व पुष्पराज बैल या जोडीने तृतीय क्रमांक मिळवत ट्रॅक्टर वर आपले नाव कोरले तर विशेष बक्षीस बकासुर या बैलाला देण्यात आले.पट्टा पद्धतीमध्ये दहा पट्टे ठेवले होते. यामध्ये दोन गट करण्यात आले होते.
आयपीएलच्या धर्तीवरच जसे क्रिकेटचे सामने डे नाईट होतात त्याच पद्धतीने या बैलगाड्या शर्यती सकाळी साडेसहा पासून रात्री साडेबारापर्यंत ‘डे नाईट‘ सुरू होत्या.पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच हे बैलगाडी शर्यतीचे मैदान असेल या स्पर्धेत बैलजोड्या रात्रदिवस पळवल्या गेल्या.या भव्य बैलगाडा शर्यतीसाठी दोन फॉर्च्युनर कार,दोन महिंद्रा थार तर दोन ट्रॅक्टर व दीडशे मोटरसायकली अशी भव्य बक्षीसे आयोजकांनी ठेवली होती. संपूर्ण देशभरातून लाखो बैलगाडा प्रेमीची पावली मणेराजूरीच्या कोड्याच्या माळावर असणाऱ्या मैदानावर पडत होती कवठेमंकाळ व तासगाव तालुक्याच्या सीमेवर असणारे हे मैदान कधी नव्हे ते लाखोंच्या गर्दीने भरून गेले होते. यामुळे दोन्ही तालुक्याला जोडणारे रस्ते व या मैदानाकडे येणारे सर्व रस्ते दोन दिवसापासून फुल्ल होते यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
शिवसेना सांगली जिह्यच्या वतीने बैलगाडा शर्यतीचे पहिल्याच अधिवेशना निमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई,खासदार धैर्यशील माने,आमदार सुहास बाबर,माजी आमदार शहाजी पाटील आदी उपस्थित होते. भव्य जनरल बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. दिवसभर मैदानावर जल्लोषाचे वातावरण होते. लाखो शेतकरी, बैलगाडीप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहून शर्यतींचा थरार अनुभवला. प्रत्येक फेरीत प्रेक्षकांच्या घोषणांनी मैदान दणाणून गेले. या स्पर्धेचे मुख्य संयोजक डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि आकर्षक बक्षिसांमुळे ही स्पर्धा प्रचंड यशस्वी ठरली. दिवसभर मैदानावर उत्साह, ढोल-ताशे आणि पारंपरिक जल्लोष पाहायला मिळाला.तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता. यावेळी सुमारे पाच लाख शर्यत प्रेमी उपस्थित होते.
सोशल मीडियावर शर्यतीचा धुमाकूळ
मैदानावर महाराष्ट्रातून व संपूर्ण भारतातून सोशल मीडियात ज्यांचे लाखो फॉलॉवर्स आहेत अश्या बैलांचे अकाउंट असणारे व त्यांना फॉलो करणारे बैलगाडाप्रेमी हे मैदानात आलेले होते.सोशल मीडियात ट्रेंडिंग करणारे हे बैल पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. बैलाबरोबर व त्यांच्या मालकाबरोबर सेल्फी काढण्यासाठी तुडुंब गर्दी व रेटारेटी झाली.
दुर्घटनेचे गालबोट
या बैलगाडा शर्यतीला थोडे गालबोटही लागले अतिउत्साही बैलगाड प्रेमीच्यामुळे सुमारे 15 जण या शर्यतीमध्ये जखमी झाले यातील बैलगाडी मध्ये पडून दोघांना आपला जीव गमवावा लागला तर बाकीच्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.रविवारी रात्री उशिरा या घटना घडल्या.








