कुडाळ ; प्रतिनिधी
राष्ट्रीय दृष्टीहिन संघ महाराष्ट्र, विभागीय शाखा- कोकण सावंतवाडी या संस्थेमार्फत डॉ. हेलन केलर यांची जयंती कुडाळ येथे उत्साहात साजरी करण्यात आली. गायन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण,तर संस्थेच्या सर्व अंध सभासदांना पांढरी काठी व रेमाकोटचे वाटप करण्यात आले. ही संस्था अंध बांधवांसाठी राबवित असलेले उपक्रम स्तुत्य असून या बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही कुडाळ चे तहसिलदार अमोल पाठक यांनी दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर, तहसिलदार श्री पाठक ,मराठा सभागृहाचे महेद्र गवस , राष्ट्रीय दृष्टीहिन संघ कोकण, सावंतवाडीचे अध्यक्ष बाबुराव गावडे, महासचिव शेखर आळवे, सहसचिव शाम माजगांवकर व साईकृपा अपंगशक्ती संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन व डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या संस्थेचे अध्यक्ष श्री गावडे यांनी डॉ. केलर याच्याविषयी माहिती दिली.
सौ खटावकर यांनी ही संस्था अंध बांधवांच्या हितासाठी करीत असलेले कार्य गौरवास्पद आहे. कोणतीही अडचण भासल्यास अंध अंध बांधवांनी सांगावी.ती सोडविण्यासाठी आपण सहकार्य करेन,असे सांगितले. या संस्थेतर्फे ऑनलाईन गायन स्पर्धा घेण्यात आली होती.यात प्रथम क्रमांक प्रकाश वाघ,द्वितीय समीर नाईक व तृतीय विनायक देसाई यांनी मिळविला होता.या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.तसेच संस्थेतर्फे सर्व अंध सभासदाना पांढरी काठी,तर संस्था व युनियन बँक कर्मचारी याच्या संयुक्त विद्यमाने रेनकोट वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला 60 अंधबांधव व त्याचे पालक उपस्थित होते. संस्थेचे महासचिव श्री.आळवे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी समीर नाईक, संजय लोणकर, संतोष दळवी, सदानंद पावले, प्रशांत कदम, अरविंद आळवे, शेजल आळवे यांनी सहकार्य केले.









