सकाळी उठतानाच घरातून एखाद्या छानशा उपवासाच्या पदार्थाचा वास आला की समजावं आज कुठलातरी उपवास आहे. वर्षभर नित्यनेमाने उपवास करणारी घरातली मोठी मंडळी कायमच नेमस्त असल्याने आमच्यासारख्या बेशिस्त लोकांची खाण्याची चंगळ होत असायची. उपवासाचे पदार्थ कमी प्रमाणात केले असले तरी ते सगळ्यांना वाटून मगच खायचे असतात, असा अलिखित संस्कार मनावर कोरला जायचा. सगळ्यात शेवटी घासातला घास देणारी माझी आई किंवा आजी प्रसन्नचित्ताने कशा वावरतात याचा एक संस्कार आमच्यावरती न कळत केला जायचा. या सगळ्या सणवारातून व्रतवैकल्ये यातून आमच्या वागण्यावर, बोलण्यावर, खाण्यावर सतत संस्कारच केले जात असायचे. याचा उलगडा आता व्हायला लागलाय.
आई-वडिलांना आदरार्थी अहो म्हणणारे आम्ही वडिलांना तीर्थरूप म्हणण्याचं कारण आता आमच्या लक्षात येतं. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दुसऱ्याच्या सुखासाठी खर्ची पडायचा. आताचे आम्ही स्वांत सुखाय जगणारे लोक फक्त वयाने वाढतो, पैशाने वाढतो, श्रीमंत होतो पण तीर्थरूप म्हणण्याच्या योग्यतेचे होतो का असा प्रश्न आपल्यालाच पडतो. प्रत्येक क्षण तीर्थरूप होण्यासाठी देह परोपकारी भिजायला लागतो. म्हणजेच आमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण शंकराच्या पिंडीवर होणाऱ्या अभिषेकासारखा कृतार्थ होतो. ज्यांच्या आयुष्यात असे क्षण येतात ते खरे तीर्थरूप, बाकी सगळे स्वार्थरूप. अशा संस्कारांमुळे भारतीय संस्कृती जगावेगळी ठरली आहे. विश्व कल्याणाचे पसायदान मागणारे आम्ही सर्वे संतु निरामया म्हणत असल्याने सुखाचं आयुष्य जगतोय. भलेही आम्ही विकसित देशांत मागे असू पण सुखाच्याबाबतीत त्यांच्या कित्येक मैल पुढे आहोत. या संस्कारांना निमित्त असतं ते आमच्या सणावारांचं. प्रत्येक दिवस हा आमच्यादृष्टीने उत्साहाचा निर्माता असतो. त्या दिवसाचं नक्षत्र, त्या दिवसाचा ऋतू, त्या दिवसाची घट्ट पकड आमच्यासाठी अनेक सणांची रेलचेल घेऊनच येतात. ज्या दिवशी काहीच नसते त्यादिवशी पौर्णिमा, अमावस्या, चतुर्थी आणि एकादशी काहीतरी असतंच. भरपेट खायला शिकवणारे सण उपवास-तापासाचे दिवससुद्धा वेगवेगळे घेऊन येतात आणि मग आमच्या शरीराचं गणित उत्तम ठेवतात. सूर्य उगवायच्या आत आम्ही त्याच्या आगमनाची तयारी करतो. नदीवर स्नानाला जाऊन येतो. सडा रांगोळ्या काढून त्या सूर्यालाच आम्ही पायघड्यासुद्धा घालतो आणि मग त्या सूर्याच्या साक्षीने घरामध्ये विविध पदार्थदेखील करतो. केलेले पदार्थ सर्वप्रथम देवाला दाखवायचे असतात नैवेद्य म्हणून हा संस्कारदेखील आम्हाला सणावारांमुळेच होतो. जेवायला बसल्यानंतर सुद्धा स्वत: जेवायच्या आधी आहुती घालून आमच्या अवतीभोवती असणारे सूक्ष्मजीव जंतूदेखील पोटभर जेवले पाहिजे, याचा संस्कार हे सणवारच करत असतात. या प्रत्येक सणवाराला त्या त्या ऋतुमानानुसार आमच्याकडचे पदार्थ किंवा गोडधोड हे देखील ठरलेले असते. या सगळ्याच्या मागे आयुर्वेद जरी असलं तरी आमच्या प्रकृतीचीच काळजी त्यात घेतलेली असल्यामुळे असे सणवार आमच्या देशात तुम्हाला प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी महात्म्य देऊन साजरा करण्याचा परिपाठ येथे आहेच.








