आमची आई चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा झाल्यानंतर बाहेर जाऊन चंद्राला वाढते. तिला सगळे हसतात. आता चांद्रयान थेट चंद्रावर पोहोचलं तरी तू चंद्राला कसं काय ओवाळतेस? त्याच्यावर ती एकच उत्तर देते ‘ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्या जगत्….’ म्हणजेच जगातल्या प्रत्येक कणात ईशतत्व आहेच, हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. आम्ही मात्र परकीय संस्कृतीच्या मागे लागल्यामुळे जगातली प्रत्येक गोष्ट ही उपभोगासाठीच असते, खाण्यासाठी असते हेच लक्षात ठेवत असल्यामुळे आम्हाला आईचे हे तत्व काही फारसं पटत नाही. पु.ल.देशपांडे त्यांच्या संस्कृतीचे वर्णन द्राक्ष संस्कृती व आपली रूद्राक्ष संस्कृती असे का करतात ते लक्षात येतं. घरात पाळलेल्या कोंबड्या, बकऱ्या, गाई, म्हशी या सगळ्या कापून खायच्या असतात, असं शिकवणारे परकीय संस्कार, संस्कृती आम्हाला खरं म्हणजे परवडणारी नाहीच. अशावेळी आमची संस्कृती जी प्रत्येक गोष्टीत ईशतत्व बघते आणि प्रत्येकाला जपण्याचा प्रयत्न करते. या नैसर्गिक कड्या जोडलेल्या राहिल्या तरंच आपलं जगणं सुसह्य होईल, याचाच संदेश आम्हाला अप्रत्यक्षरीत्या मिळत असतो. कारण विश्व म्हणजेच कुटुंब आणि कुटुंब हे कोणी एका माणसाचं नसतं, तर अनेक माणसांचं त्यात माणसांनी पाळलेल्या गाई म्हशींचं, पक्षांचं, प्राण्यांचं लावलेल्या वृक्षवेलींचं असं हे कुटुंब असतं. हे कुटुंब जगाच्या स्वरूपात पाहणारे आमचे संत आम्हाला सणवारातून संदेश देतात. प्रत्येक सणाला कुठेतरी वृक्षाची पूजा असते. कोणत्यातरी प्राण्याची पूजा असते. श्रावण महिना म्हणजे अशा या सगळ्या सणवारांची रेलचेल असलेला महिना, आम्हाला हेच शिकवत असतो. या पूजा म्हणजेच दुसऱ्यामधलं मोठेपण, त्याची श्रेष्ठता मानण्याचा एक मार्ग असतो परंतु आजकाल पूजा करणे म्हणजे लोकांना गमतीचा विषय वाटतो. कसंबसं त्या देवावर पाणी घालायचं आणि दोन-चार फुल वहायची आणि पळायचं. तीसुद्धा एक सौंदर्य यात्रा असते. आमच्याकडच्या प्रत्येक पूजेमध्ये अतिशय देखणेपण तुम्हाला दिसून येईल. फुलेसुद्धा कोणत्या देवाला, कोणती ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगसंगती जपलेल्या असतात. आम्ही साधं पौर्णिमेला पूजा करतो तर ती निसर्गातल्या सौंदर्याची पूजा असते. चंद्रामुळे कोणतं झाड विकसित होतं, कोणाचं फूल उमलतं या सगळ्या गोष्टी अप्रत्यक्षरीत्या शिकवणारे आमचे सणवार या प्रत्येक दिवसाचे महात्मे आम्हाला सांगत असतात. आम्ही प्रत्येक गोष्टीची पूजा करतो. या गोष्टींना हसणारे जगात अनेक लोक आहेत. आमच्या घराचीसुद्धा मी पूजा करतो. आमच्या उंबऱ्याची पूजा रोज रांगोळी काढून करतो. याचं कारण आज आमच्या संस्कृतीने आम्हाला सांगितले की बाहेरून येणाऱ्या वाईट गोष्टींना अडवणारा हा उंबरा चांगल्या गोष्टींना मात्र सतत पायघड्या घालत असतो, हे लक्षात ठेवायला हवं. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही पैशाची पूजा करतो पण त्याचा खरा अर्थ आहे की घरातली लक्ष्मी म्हणजे स्त्राr. हीचा सन्मान त्या दिवशी करायला हवा. तिची पूजा करण्याचं काम घरातल्या सगळ्यांनी करायला हवं कारण तिची श्रेष्ठता त्या ठिकाणी मान्य केली जाते. आमच्या देव्हाऱ्यात वेगवेगळ्या मूर्ती दिसतात. आम्हाला जे जे रूप आवडतं त्या रूपात आम्ही देवाची पूजा रोज बांधत असतो. परंतु हा भावनेचा भाग झाला. तरीही कुठेतरी आमच्यामध्ये एक उत्तम सौंदर्यदृष्टी निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न असतो. म्हणून असे सणवार आम्हाला दुसऱ्याचं मोठेपण मान्य करायला लावतात. विश्वातील प्रत्येक गोष्ट जपायला शिकवतात आणि प्रत्येकाला दिल्याशिवाय खायचं नाही हादेखील संस्कार करतच असतात.
Previous Articleट्रम्प समर्थकाला 22 वर्षांची शिक्षा
Next Article बागलकोट-कुडची रेल्वेमार्गाचे काम 2025 आधी पूर्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








