सण आणि संस्कार.. भाग 2
उत्तरार्ध
ज्ञानमयोसी विज्ञानमयोसी असं जे म्हटलं जातं त्याचा अर्थच असा आहे की सणवारांचे अनुभव श्रद्धाही पेरतात आणि विज्ञानाची दृष्टीही देतात. म्हणूनच असे सणवार आमच्यात साजरे करण्याची प्रवृत्ती निर्माण व्हायला हवी. सण, ऋतु याप्रमाणे प्रत्येक दिवसाचे किंवा सणाचे पदार्थदेखील ठरलेले असतात. त्याच्यामध्ये इतकी विविधता आहे की ती जोपासताना आमच्या पूर्वजांनी आमच्या आरोग्याचा, आहाराचा, विहाराचा संस्कार अप्रत्यक्षरीत्या आमच्यापर्यंत पोहोचवला. या हिंदू संस्कृतीतून इतका सुंदर तो जपला जातो की आज साऱ्या जगालासुद्धा आमचे संस्कार, आमचे सर्व आदर्श वाटायला लागले आहे. परक्यांचे सण तुम्ही पाहिले तर ते कुठेतरी मध्यरात्री साजरे होणारे भुताच्या गोष्टी सांगणारे आणि त्यातून आपल्याला काही आरोग्याला मिळेल असे नसणारे असतात. अशावेळी सगळ्यांना एकत्र आणणारे सण सगळ्यांची काळजी घेणारे सण आणि सगळ्यांचे आरोग्य जपणारे सण सगळ्या जगाला आदर्श ठरायला लागलेले आहेत. आमच्या संस्कृतीमधला योगाभ्यास आज सगळ्या जगाला हवाहवासा वाटतोय कारण शरीराच्या तंदुरुस्तीबरोबरच मनशांतीसुद्धा तो सगळ्यांना देतोय. आमच्या संस्कृतीमधला आयुर्वेद प्रत्येक देशांना हवासा वाटायला लागलाय. कारण त्यांची औषधे, त्याचे उपचार कोणतेही परिणाम तुमच्या शरीरावर दाखवत नाहीत पण आम्ही मात्र परकीयांच्या अनेक पद्धती मॉडर्न होण्याच्या नादात स्वीकारत बसतो. खरं तर परदेशामध्ये असलेलं वातावरण हे अन्नधान्य टिकवण्यासाठी योग्य नसल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्ये ठेवायला लागते आणि अशा फ्रिजमध्ये साठवलेल्या गोष्टी कधीतरी दोन-चार महिन्यांनी गरम करून खाण्याची पद्धत आमच्या आरोग्याला योग्य नाही, हे जेव्हा आमच्या लक्षात येतं तेव्हा आपला गरम वरण-भात किंवा पोळी भाकरीच बरी अशी म्हणण्याची वेळ आमच्यावर येते. फ्रीजमध्ये गोठवलेले पदार्थ पुन्हा गरम करून खाणं आरोग्याला अपायकारक व त्रासदायक असतं. आमच्या प्रत्येक सणाला केलेल्या ताज्या पदार्थांचा नैवेद्य आणि त्यामागे करणाऱ्याची असलेली श्रद्धा या सगळ्या गोष्टी तुमच्या आरोग्यावर उत्तम परिणाम करणाऱ्या दिसतात. म्हणूनच आमचे सणवार, या सणवारांच्या वेळेला त्या ऋतूत येणारी फळं, त्या वेळचे आहाराचे पदार्थ या सगळ्या गोष्टी नक्की आठवाव्या. आमचे सण आरोग्याचा संस्कार करत असतात आणि आमची संस्कृतीदेखील मिरवत असतात.
-आज्ञा कोयंडे








