जिल्ह्यातील 4 लाखांहून अधिक मालमत्तांचे खाते हस्तांतर प्रक्रिया अडचणीत : मालमत्ता मालकांचे नाव अपडेट करण्यास विविध समस्या
बेळगाव : वारसा प्रक्रिया राबविण्यासाठी महसूल खात्याने कंबर कसली आहे. यासाठी तलाठी व त्यांचे सहकारी गावोगावी जाऊन वारसा प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे स्वीकारत आहेत. मात्र बहुतांश जणांकडे जुन्या मिळकतींची आवश्यक कागदपत्रे नसल्याने त्यांना कागदपत्रे मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे वारसदारांची एकप्रकारे फजिती होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महसूल खात्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 4 लाख 64 हजार 163 वारसा जमिनी आहेत. यापैकी 63184 भूखंडांचे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. जानेवारी 2024 पासून महसूल खात्याच्यावतीने राज्यभरात वारसा नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र यामध्ये अपेक्षित प्रगती झालेली नाही. आधार लिंक प्रक्रियेनंतर असे आढळून आले आहे की, जिल्ह्यातील 4 लाखांहून अधिक मालमत्ता अद्यापही मृत व्यक्तींच्याच नावे आहेत. तलाठी व महसूल निरीक्षकांनी याबाबतची योग्य माहिती दिली नसल्याचे महसूल खात्याचे म्हणणे आहे. वारसा प्रक्रियेमध्ये दाखल करण्यात येणाऱ्या कागदपत्रांमध्ये मृत्यू प्रमाणपत्राची समस्या निर्माण होत आहे.
अनेक मालमत्तांचे मूळमालक मयत होऊन अनेक वर्षे उलटली आहेत. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांच्या नावे सदर जमीन होणे गरजेचे आहे. पण मृत्यू प्रमाणपत्र आणि वंशावळीशिवाय वारसा करणे शक्य नाही. विवाहित मुली, त्यांच्या नातवंडांच्या नावावर असलेल्या जमिनीच्या मालकी हक्कांचे हस्तांतरित करण्यास सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत, ही देखील एक अडचण आहे. वारसा प्रक्रिया अभियानादरम्यान किमान 50 टक्के उद्दिष्ट गाठण्यात यावे, अशी सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. महसूल निरीक्षक शिरस्तेदार, तहसीलदारांनी जागेचे संयुक्त सर्व्हेक्षण करावे आणि वंशावळीवर आधारित वारसा खाते तयार करावेत, त्यानंतर सातबारा उतारा हयात असलेल्या व्यक्तींच्या नावे करावा, वादग्रस्त प्रकरणांमध्ये संयुक्तरित्या खाते तयार करून जमिनीचे वारसदार कोण आहेत? यांची ओळख पटवावी, अशी सूचना सरकारने केली आहे. त्यामुळे अधिकारी सदर वारसाप्रक्रियेचे काम पूर्ण करण्यासाठी घाई करत असल्याने कागदपत्रांची योग्य तपासणी केली जात नाही. अशा तक्रारी आहेत. वंशावळीत खोटी नावे दाखल केल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे वारसदारांची फसवणूक होण्याची भीतीदेखील निर्माण झाली आहे.
जमिनी नावे करून घेणे गरजेचे
अनेकजणांनी वारसानुसार सातबारा उताऱ्यावर आपली नावे दाखल करून घेतली नसल्याने संबंधितांना अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. शेतजमिनी मयतांच्या नावे असल्याने कृषी कर्ज उपलब्ध होत नाही, त्याचबरोबर बियाणे, खते, शेती संबंधिची यंत्रसामग्री घेण्यासाठी कोणतेही अनुदान मिळत नाही. अतिवृष्टी किंवा हवामानामुळे पिकवाया गेल्यास भरपाई मिळत नाही. त्यामुळे हयात असलेल्यांनी आपल्या जमिनी नावे करून घेणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बेळगाव तालुक्यात केवळ 12 हजार 722 जमिनींची वारसा प्रक्रिया पूर्ण
बेळगाव तालुक्यात 1 लाख 10 हजार 499 पैकी केवळ 12 हजार 722 जमिनींची वारसा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. खानापूर तालुक्यात 52,689 पैकी 3288, चिकोडीत 35,281 पैकी 1704, अथणी 19,209 पैकी 3,876, रायबाग 26,110 पैकी 5,829, गोकाक 22,770 पैकी 3,109, हुक्केरी 63,059 पैकी 6,325, सौंदत्ती 11,168 पैकी 2,496, बैलहोंगल 27,570 पैकी 4,566, रामदुर्ग 16,597 पैकी 3800, कित्तूर 1362 पैकी 1,891, निपाणी 42,013 पैकी 5,652, कागवाड 9,429 पैकी 2203, मुडलगी 9,228 पैकी 1,828, यरगट्टी 4,921 पैकी 900 इतक्या शेतजमिनीच्या वारसाचे काम पूर्ण झाले आहे.









