दोघे जखमी, सिव्हिलमध्ये उपचार सुरू : आरोपीच्या दुचाकीची मोडतोड

बेळगाव : मच्छे (ता. बेळगाव) येथील शिवारात मजगाव येथील एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास घडली आहे. या घटनेत आणखी दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मजगाव व मच्छे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर येथून आरोपी व त्याच्या साथीदारांनी पलायन केले आहे. प्रतिक एकनाथ लोहार (वय 22, रा. मजगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो व त्याचा मित्र स्वप्नील मनोहर सुतार (वय 22) व आणखी एकाला मच्छे येथे शिवारात गेले असता त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, जखमी स्वप्नील याला प्रतिक याचा फोन आला. तू ताबडतोब मच्छे येथे ये, असे सांगितले. त्यावर स्वप्नील व त्याचा आणखी मित्र मच्छे येथील शिवारामध्ये गेले. त्यावेळी संशयित आरोपी प्रवीण ऊर्फ छोट्या बाबु बळगण्णावर आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. 10 ते 12 जण असल्यामुळे स्वप्नील आणि त्याच्या मित्राने तेथून पळ काढला. मात्र प्रतिक याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मजगाव परिसरात खळबळ उडाली होती. मृत्यू झाल्याची घटना कळताच मच्छे येथे साऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर प्रतिक याचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला. या घटनेनंतर संशयित आरोपी प्रवीण हा मजगाव येथील आपल्या घरी आला. त्यानंतर त्याने आपली मोटार सायकल घेवून पुन्हा बाहेर पडला. यावेळी काही जणांना तो नजरेला आला. त्यामुळे त्याचा काही तरुणांनी पाठलांग केला. संगोळ्ळी रायण्णा वसाहतीजवळ तो सापडला. मात्र दुचाकीमध्ये असलेली जांबिया काढून त्याने धमकी दिली.
मात्र तरुणांनी त्याच्यावर चाल केली असता त्याने तेथून पलायन केले आहे. या घटनेनंतर दुचाकीवर दगडफेकून तसेच मोडतोड केली आहे. प्रवीण याच्यावर उद्यमबाग पोलीस स्थानकामध्ये अनेक गुन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी त्याला गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आली होती, असे सांगण्यात आले आहे. या घटनेत स्वप्नील व त्याचा आणखी एक मित्र जखमी झाला आहे. स्वप्नील याने पोलिसांना याबाबत काही माहिती दिली आहे. रात्री उशीरापर्यंत फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शेखर एच. टी., बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी पाहणी केली. त्यानतंर सिव्हिल हॉस्पिटललाही भेट दिली. या घटनेमुळे मजगाव परिसरात मात्र तणाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन सणा दिवशीच ही घटना घडली आहे.
संशयितावरही हल्ल्याचा प्रयत्न
खून करुन संशयित आरोपी प्रवीण बळगण्णावर हा मजगाव येथे आपल्या घरी आला. त्यानंतर आपण जणू काहीच केले नाही, अशा आविर्भावात तो पुन्हा घरातून बाहेर दुचाकीवरुन जात होता. याची माहिती काही तरुणांना मिळाली. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या तरुणांनी त्याच्या दुचाकीचा पाठलाग केला. संगोळ्ळी रायण्णा वसाहतीजवळ संशयित आरोपीने दुचाकी तेथेच सोडली. आणि दुचाकीमधील जांबिया बाहेर काढली. हातात जांबीया घेवून त्याने तरुणांना पुन्हा धमकी दिली आणि पलायन केले आहे. त्यानंतर जमावाने त्याच्या दुचाकीची मोडतोड केली. या घटनेची माहिती उद्यमबाग पोलिसानां मिळाली. त्यानंतर उद्यमबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
कारण गुलदस्त्यात
या हल्ल्यामागचे कारण मात्र रात्री उशीरापर्यंत समजले नाही. पोलीसही रात्री उशीरापर्यंत तपास करत होते. संशयित आरोपी आणि त्याचे साथीदारांनी पलायन केले आहे. त्यामुळे त्या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतरच या हल्ल्यामागचे नेमके कारण समजणार आहे. मयत झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी तसेच जखमी झालेल्यांनीही हल्ल्याचे नेमके कारण रात्री उशीरापर्यंत सांगितले नव्हते. त्यामुळे आरोपी सापडल्यानंतरच कारण स्पष्ट होणार आहे.









