अनैतिक संबंधाच्या संशयातून केला खून; चार वर्षे वादातील अखेर पर्यावसान खूनात
सेनापती कापशी प्रतिनिधी
कागल तालुक्यातील बाळेघोल येथील दोन युवकांच्या पूर्ववैमनस्यातून असणाऱ्या धुसफुशीवरून एकाने दुसऱ्या तरुणाच्या कानशिलात गावठी पिस्तुलातून गोळी झाडून अमानुष खून केला. भरत बळीराम चव्हाण (वय ३२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या खुनातील विकास हेमंत मोहिते (वय २५) असे संशयित आरोपीचे नाव आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बाळेघोल- सेनापती कापशी हद्दीतील चिगरे पाणंदीमध्ये ही घटना घडली. संशयित आरोपी विकास मोहिते स्वतःहून पोलिसांमध्ये हजर झाला आहे. या खुनातील गोळीबाराने चिकोत्रा खोऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी, मयत भरत चव्हाण याचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. एक वर्षे कसातरी संसार झाला. त्यानंतर या प्रकरणातील संशयीत आरोपी विकास मोहिते याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय मयत चव्हाण याला होता. यावरून चव्हाण याचे पत्नीशी वाद सुरू झाले. या वादातूनच त्याने पत्नीशी घटस्फोट घेतला. परिस्थती बेताची असल्याने तो मोलमजुरी करीत आई-वडीलासमवेत राहत होता.
चव्हाण आणि मोहिते यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत गेला. गावातील ग्रामस्थांनी मध्यस्थी करून या दोघांमधील भांडण मिटवले होते. तरी देखील एकमेकांमध्ये कायम धुसफूस राहिली. दोन महिन्यापूर्वीही वाद झाला होता. त्यावेळी तुला सोडणार नाही, अशी धमकी मोहिते याने चव्हाणला दिली होती. विशेष म्हणजे विकास मोहिते हाही विवाहित असून त्याला लहान मुलगी आहे. या दोघांतील वाद इतका विकोपाला गेला अखेर या वादाचे रूपांतर खूनामध्ये झाले.
सोमवारी भरत चव्हाण आणि त्याचा एक सहकारी ओंकार जाधव हे दोघे मोटरसायकलवरून विहिरीतील गाळ काढण्याच्या कामासाठी चिगरे पाणंदीतून जात होते. मात्र सातत्याने त्रास देणाऱ्या विकास जाधव याने चव्हाण याला रस्त्यातच गाठले. त्याने आपली मोटरसायकल आडवी मारून वादाला सुरवात केली. काही अंतरापर्यंत मोटरसायकल वरूनच वाद सुरू राहिला. भरत सोबत असलेल्या ओंकार जाधव याला गाडीवरून उतरण्यास भाग पाडले. तो चालत माघारी येत होता. थोड्या अंतरावर म्हणजेच चिगरे पाणंदी शेजारील अनिल ढोले यांच्या शेताजवळ गेल्यानंतर भरत आणि विकास यांच्यात जोराचा वाद सुरू झाला. शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर दोघांत झटापटी सुरू झाली. मात्र भरत हा विकास पेक्षा ताकतीने भारी असल्याने आपला टिकाव लागणार नाही हे ओळखून विकासने रागाच्या भरात लपवून ठेवलेली गावठी बनावटीची पिस्तूल काढून थेट विकासच्या कानशीलात गोळी झाडली. विकास रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून भरतने तिथून पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकून ओंकार जाधवने माघारी फिरून आरडाओरडा केला. शेतावर कामाला जाणारे शेतकरी घटनास्थळी आले. गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी बाळेघोल गावात आणि परिसरात पसरली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान डीवायएसपी संकेत गोसावी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना सूचना केल्या.