अगसगा रोडवर काकती पोलिसांकडून कारवाई
बेळगाव : अगसगा रोडवर काकती पोलिसांनी वाहनांची तपासणी वाढवली आहे. पंधरवड्यात टिप्परमुळे दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर टिप्परचालकांची मनमानी रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी वाढली होती. काकती पोलिसांनी अलतगा क्रॉसपासून राजगोळी रोडवर टिप्पर व इतर वाहने अडवून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. याबरोबरच टिप्परचालक नशेत वाहने चालवतात का? याची पडताळणी करण्यासाठी चालकांचीही तपासणी करण्यात आली. सोमवारी ठिकठिकाणी वाहने अडवून या मार्गावर तपासणी झाली. काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी ही मोहीम राबविली. कागदपत्रे नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत आहे. नशेत वाहने चालवणाऱ्यांवर एफआयआर दाखल करून न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे. या मार्गावर बेकायदा वाळू वाहतूक होते. त्यामुळेच अपघात वाढत आहेत.









