अद्याप बरेच काम शिल्लक : संबंधित अधिकाऱ्यांनी काम पूर्ण झाल्यावरच अवजड वाहतूक सुरू करण्याची मागणी
खानापूर : बेळगाव-गोवा-चोर्ला रस्त्यावरील कुसमळीजवळील मलप्रभा नदीवर उभारण्यात आलेल्या नव्या पुलावरून गेल्या आठ दिवसांपासून अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात गोव्याला अवजड वाहतूक सुरू झाली आहे. अवघ्या चार महिन्यात घाईगडबडीत उभारण्यात आलेल्या पुलाचे काम अर्धवट स्थितीत असताना या पुलावरून मोठ्याप्रमाणात अवजड वाहतूक सुरू झाली आहे. गोवा राज्यासाठी आणि गोव्यातून इतर राज्यात मालाची ने-आण करण्यासाठी मोठ्याप्रमाणात अवजड वाहतूक होते. यात किमान 40 टनापासून ते शंभर टनापर्यंतची वाहतूक अवजड वाहनांतून होते. त्यामुळे पुलाला धोका होण्याची शक्यता या भागातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुलाचे काम पूर्ण झाल्यावरच अवजड वाहतूक सुरू करावी, अशी मागणी होत आहे. बेळगावहून गोव्याला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून चोर्ला रस्त्याचा विकास गेल्या काही वर्षात करण्यात आला. या मार्गावर कुसमळीजवळील मलप्रभा नदीवर जवळपास 130 वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल उभारण्यात आला होता. याच पुलावरून गोवा राज्याला वाहतूक होत होती. मात्र गेल्या काही वर्षापासून पूल कमकुवत झाल्याने हा पूल पाडवून नव्याने पूल उभारण्याची मागणी होत होती. यासाठी नवा पूल उभारणीसाठी निधी मंजूर झाला होता. या नवीन पुलाचे काम जानेवारी महिन्यात हाती घेण्यात आले होते. त्यासाठी जुना पूल पाडवण्यात आला होता. त्यामुळे बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती.
पुलावरून शेकडो टन वजनाची वाहतूक
वाहतुकीसाठी नव्या पुलाचे काम अतिशय घाईगडबडीत करण्यात आले. अद्याप पुलाचे काम शिल्लक असताना मंगळवार दि. 1 जुलैपासून या पुलावरून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर गेल्या आठ दिवसांपूर्वीपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीला हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यामुळे या पुलावरून मोठ्याप्रमाणात शेकडो टन अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. पुलाचे काम मोठ्याप्रमाणात अपुरे असताना तसेच दोन्ही बाजूच्या संरक्षक कठड्याचे काम शिल्लक असताना पुलाच्या दोन्ही बाजूला घाईगडबडीत भराव टाकून या पुलावरून अवजड वाहतूक सुरू केल्याने पुलाला धोका निर्माण होऊ शकतो.
पुलाची चाचणी घेण्याची गरज
पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठड्याचे काम पूर्णपणे शिल्लक असताना अवजड वाहनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही धोका पत्करुन या पुलावरून वाहतूक करावी लागत आहे. यासाठी प्रशासनाने पुलाच्या भविष्याचा विचार करून पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत तसेच वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या चाचण्या पूर्ण केल्यानंतरच या पुलावरून अवजड वाहतूक सुरू करणे गरजेचे होते. मात्र घिसाडघाईत पुलाचे काम पूर्ण न होताच या पुलावरून अवजड वाहतूक सुरू केल्याने पुलाला धोका होण्याचा शक्यता असल्याचे नागरिकांतून आणि प्रवाशांतून तसेच कणकुंबी, जांबोटी भागातील नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









