उत्तर-गोवा जिल्हाधिकारी यांनी काढला आदेश : कामाला सुरुवात झाल्यानंतर वाहतूक अन्य मार्गाने वळविणार
वार्ताहर /कणकुंबी
बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यापैकी साखळी ते कर्नाटक हद्द म्हणजे चोर्लापर्यंतच्या रस्त्यावरून अवजड व्यावसायिक वाहनांना बंदी घातली असून बंदी मार्च 2023 पर्यंत असल्याचा आदेश उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी यांनी नुकताच बजावला आहे.
मागील आठवडय़ापासून चोर्ला मार्गावरील अवजड वाहनाना बंदी घालण्यात आली असून चोर्लाघाट राष्ट्रीय महामार्गावरील साखळी जंक्शन ते कर्नाटक हद्द (चोर्ला) पर्यंतच्या मार्गावरील अवजड वाहनाना बंदी घालण्यात आली आहे. दत्तवाडी साखळी जंक्शन ते चोर्लाघाट गोवा हद्द तसेच पीएचसी साखळी जंक्शन ते चोर्लाघाट गोवा हद्द आणि होंडा जंक्शन ते चोर्लाघाट गोवा हद्द असा या मार्गाचा आदेशामध्ये समावेश असून या मार्गावरून अवजड व्यावसायिक वाहनाना मार्च 2023 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या मार्गावरील अवजड वाहतुकीला बंदी घातली असली तरी अद्याप या मार्गावरून काहीअंशी अवजड वाहतूक सुरूच आहे.
अवजड वाहतुकीमुळे रस्ता खराब
बेळगाव-चोर्ला-पणजी हा गोव्याशी जोडणारा अतिशय जवळचा रस्ता असल्याने या मार्गावरून अनेक प्रकारची हजारो वाहने दररोज ये-जा करतात. वास्तविक 15 ते 20 टन वजन वाहतुकीची क्षमता असलेला हा रस्ता असून गेल्या आठ-दहा वर्षापासून या मार्गावरून जवळपास 35 ते 40 टन वजन वाहतूक करणारी अवजड वाहने आहेत. यामुळे रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून सद्यस्थितीत हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनलेला आहे. अवजड वाहनाना बंदी असताना शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे वाहतूक सुरू असते, या मार्गावरील कुसमळी नजीकच्या मलप्रभा नदीवरील पुलावरुन अवजड वाहतूक करण्यास बंदी असल्याचा फलक लावलेला आहे. परंतु ही 40 टनाची अवजड वाहने या मार्गावरून गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहेत. या संबंधित प्रशासनाला विचारले असता वाहतूक प्रशासन पोलिसाकडे बोट करते तर पोलीस प्रशासन आम्हाला तशा प्रकारचा आदेशच नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. या मार्गावरून अवजड वाहनांची राजरोसपणे वाहतूक पाहिली असता याला प्रशासनच जबाबदार आहे अशी चर्चा सुरू आहे.
ऑक्टोबरपासून रस्ता कामाला सुरुवात
आता बेळगाव, चोर्ला, पणजी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला असून या रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी 279 कोटी रुपये मंजूर झाला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून साडेसात मीटर रुंदीकरणाचा हा मार्ग असणार आहे. कामाला सुरुवात झाल्यानंतर या मार्गावरील सर्व वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाणार आहे.









