ऑनलाईन टीम / तरुण भारत :
वीकेंड, 15 ऑगस्ट आणि पारसी वर्षारंभ अशा सलग सुट्टयांमुळे अनेक जण पर्यटनासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळपासून पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी आहे. 24 तास उलटले तरीही या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी कायम आहे. परिणामी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुण्याहून मुंबईला जाणारी मार्गिका काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.
एक्स्प्रेस वेवर शनिवारी सकाळपासून झालेली वाहतूक कोंडी कायम आहे. सुमारे दीड किलोमीटरपर्यंत बोरघाटात रांगा लागल्या आहेत. बोरेघाटातील अमृतांजन कमानपासून खोपोलीकडे वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. तब्बल 24 तास उलटूनही ही वाहतूक कोंडी कायम आहे. बोरघाट वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
वाहतूक कोंडीमुळे लोणावळा, महाबळेश्वर, कोल्हापूर अशा पर्यटनस्थळी जाण्यासाठी निघालेल्या पर्यटकांची वाहतूक कोंडीमुळे निराशा झाली आहे. वारंवार प्रशासनाच्या वतीने विनंती करूनही पर्यटक आपल्या खासगी वाहनाने प्रवास करताना दिसत आहेत.








