पूर्वसूचना न देताच दुरुस्ती कामाला सुरुवात : वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ
बेळगाव : कोणतीही पूर्वसूचना न देता शुक्रवारी तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील कामाला अचानक सुरुवात करण्यात आली. याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला. काँग्रेस रोडवर तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुसरे रेल्वेगेटनजीक बॅरिकेड्सला लावलेल्या दोऱ्या तोडून वाहनचालकांनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला प्रवेश केला. दिवसभर अशीच वाहतूक कोंडी सुरू असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पूर्वसूचना देणे गरजेचे होते. परंतु, तसे न होता अचानक कामाला सुरुवात करण्यात आल्याने उड्डाणपुलापर्यंत आलेल्या वाहनचालकांना पुन्हा माघारी फिरावे लागले. आरपीडी सर्कलमधून येणारी वाहतूक अनगोळ कॉर्नरपासून दुसरे रेल्वेगेटकडे वळविण्यात आली होती.
दुसरे रेल्वेगेट परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स लावण्यात आले. त्यामुळे टिळकवाडीच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी वळसा घालून जावे लागत होते. तसेच तिसरे रेल्वेगेट येथून खानापूर रोडपर्यंत रस्ता अरुंद असल्याने केवळ एकच वाहन पुढे सरकत होते. यामुळे तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलापासून दुसरे रेल्वेगेटपर्यंत काँग्रेस रोडवर प्रचंड गर्दी झाली होती.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे रहदारी पोलिसांनाही मनस्ताप सहन करावा लागला. दुसरे रेल्वेगेट येथे लावण्यात आलेले बॅरिकेड्स दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. परंतु, वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी नागरिकांनी बॅरिकेड्सच्या दोऱ्या तोडून दुसऱ्या बाजूला प्रवेश केला. सकाळी व संध्याकाळी उद्यमबाग येथील कामगार ये-जा करताना प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले.









