रायबंदरची ‘सह्याद्री’ पणजीच्या मदतीला : वाहतूक कोंडीचा परिणाम
प्रतिनिधी / पणजी
पणजीच्या मांडवी नदीवर दिमाखात उभ्या असलेल्या ‘अटल सेतू’ या पुलावर सध्या काम सुरू असल्याने दररोज वाहनचालक व नागरिकांना वाहतूक कोंडीचा विचित्र अनुभव येत आहे. आता या वाहतूक कोंडीला वैतागून वाहनचालक पणजीत येण्यासाठी व जाण्यासाठी फेरीबोटीकडे वळल्याने बेती-पणजी या मार्गे सुरू असलेल्या फेरीबोट सेवेवरही या वाहतुकीचा परिणाम झाला आहे.
पणजी-बेती ही फेरीबोट सेवा वाहनचालक व नागरिकांसाठी आधार नेहमीच ठरत आला आहे. परंतु सध्या अटलसेतूच्या कामामुळे वाहनकोंडीचा अनुभव येत असल्याने पर्वरी, म्हापसा, कळंगुट या मार्गावरील लोक बेती-पणजी या फेरीबोटीवर आपली वाहने घेऊन येत असल्याने ही फेरीबोटही दिवसभर ‘फुल्ल’ होत आहे. पूर्वी या फेरीबोटीमध्ये केवळ दुचाकीवाहनांना व पादचाऱ्यांना प्रवेश दिला जात होता. परंतु सध्या चार चाकी वाहनांनाही यात प्रवेश दिला जात असल्याने त्याचा ताण फेरीबोटसेवेवर पडत आहे.
पणजी-बेती या जलमार्गावर पूर्वी एकच फेरीबोट उपलब्ध होती. परंतु आज (गुऊवारी) यामध्ये आणखी दोन फेरीबोटीची भर पडली असून, सध्या तीन फेरीबोट वाहतूक करीत आहेत. या फेरीबोटीवर आता मोठ्याप्रमाणात वाहनचालक येत असल्याने फेरीबोट ठिकाणीही वाहने काढताना व पादचाऱ्यांनाही त्रासाचे ठरत आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत या ठिकाणी फेरीबोट सेवा उपलब्ध असून, पणजीत येण्यासाठी सध्या ती एकमेव दुवा ठरत आहे.

पणजी-बेती या जलमार्गे ‘बांदोडा’, ‘आगापूर’ व आता ‘सह्याद्री’ या तीन फेरीबोट धावत आहेत. फेरीधक्क्यावर जेमतेम तीन ते चार मिनिटेच ही फेरीबोट वाहनांना व नागरिकांना घेऊन जाण्यासाठी उभी राहते. तरीही या ठिकाणी गर्दी होत असल्याने या पणजीतील वाहतूक कोंडीवर तोडगा काढावा तरी कसा? असा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे.
फेरीबोट वळविताना चालकांना होतोय त्रास
पणजी-बेती या फेरीबोट सेवेसाठी उपलब्ध असलेल्या फेरीधक्क्याच्या अवघ्या काही अंतरावर कसिनोच्या वाहतूक बोटीही जलमार्गे घिरट्या घालत असताना सध्या फेरीबोट चालकांना फेरीबोट धक्क्यावरून काढताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पणजीत कसिनोऊपी राक्षसाने अर्ध्या मांडवी नदीत आपला कब्जा केल्याने फेरीधक्क्यावरून बोटी काढताना व वळविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे फेरीबोट धक्क्याला लागून असलेल्या कसिनोंना हटविणे गरजेचे बनले आहे.









