जिल्हाधिकाऱयांच्या बंदी आदेशाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष : प्रवाशांच्या जीवाला धोका
प्रतिनिधी /वाळपई
चोर्ला घाटातून दिवसा अवजड वाहनांना उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी बंदी आदेश जारी केला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसाढवळय़ा मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक होत असून काल रविवारी यामुळे दोन अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. यावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त करुन अवजड वाहतूक बंद करण्याचे मागणी केली आहे.
होंडा, सांखळी भागातून अवजड वाहतूक बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी एक महिन्यापूर्वी दिला होता. मात्र अनमोड- रामनगर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे तेथूनही अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे याचे दुष्परिणाम गोव्यातील बाजारपेठेवर होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱयांनी आपल्या आदेशामध्ये बदल करून रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत अवजड वाहतुकीला मंजुरी दिली होती. तर सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत या रस्त्यावरून अवजड वाहतुकीला बंदी घातली आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र या आदेशाची अजिबात अंमलबजावणी होत नसल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. कारण गेल्या दहा दिवसापासून बंदी असतानाही दिवसाढवळय़ा मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्यामुळे प्रवासी वर्गाच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.
काल रविवारी एका अवजड वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे रस्त्यांच्या बाजूला दरीत कोसळण्याचा प्रकार घडला. तर दुसऱया एका वाहनाने झाडाला धडक दिल्यामुळे अपघात घडला. या दोन्ही अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र येणाऱया काळात या वाहतुकीवर दिवसाढवळय़ा प्रतिबंध न घातल्यास मोठा अपघात होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे प्रवासी वर्गाने नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.









