नवारस्ता :
कोयना धरणात या वर्षातील पहिलीच पाण्याची आवक सुरु झाली आहे. गेल्या चोवीस तासांत धरणात तब्बल 12 हजार 538 क्युसेक पाण्याची आवक झाली असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. दरम्यान, मुसळधार पावसामुळे कराड- चिपळूण महामार्गावरील वळण मार्गासाठी बांधलेला छोटा पूल वाहून गेल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक ठप्प झाली आहे तर दुचाकी आणि चार चाकी वाहने पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहेत.
मुसळधार पावसामुळे कराड चिपळूण महामार्गावरील कोयना विभागातील वाजेगाव येथे महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे वळण मार्गासाठी बांधलेला छोटा पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला. परिणामी कराड- चिपळूण महामार्गावर पाणी वाहू लागले. यामुळे कराड-चिपळूण या महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मात्र प्रशासनाने दुचाकी, चारचाकीसाठी संगमनगर, मणेरी, नेरळे, मोरगिरी या पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे तर या मार्गावरील अवजड वाहतूक काम पूर्ण होईपर्यंत बंद करण्यात आली असल्याची माहिती पाटणच्या प्रशासनाने दिली.
- वाहतूक तातडीने सुरू करण्याच्या प्रशासनाला पालकमंत्र्यांच्या सूचना..!
दरम्यान, राज्याचे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने दखल घेऊन प्रशासनाने कराड- चिपळूण मार्गावर तातडीने पर्यायी रस्ता करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
- प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल
ही घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली. याची माहिती मिळताच पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोणपे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, तहसीलदार अनंत गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पर्यायी मार्गाचे नियोजन केले. तसेच रात्री उशिरापर्यंत महामार्गावरील अवजड वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते.
- चिपळूण आगाराने बस फेऱ्या केल्या रद्द
दुपारी पूल वाहून गेल्याने वाहतूक बंदी माहिती पाटण आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर चिपळूण आगाराने दुपारी 12.30 वाजता या मार्गावर सुटणारी चिपळूण तासगाव, 2 वाजताची मिरज, 4 वाजताची बेळगाव या फेऱ्या रद्द केल्या. तर दुपारी 2 वाजता पुणे फेरी ताम्हिनी मार्गे वळवण्यात आली. गेलेल्या बसेसही दुर्घटनेमुळे अडकून पडल्याने सायंकाळनंतर पुढील आदेश येईपर्यत बससेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण यांनी दिली.
- पर्यायी मार्गाचा वापर करा
पाटण तालुक्यातील पूल वाहून गेल्याने या रस्त्यावर छोटी वाहने पर्यायी मार्गाने जाऊ शकतात. मोठ्या वाहनांची वाहतूक या मार्गाने बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी देवरूख किंवा रत्नागिरी मार्गाचा वापर करावा. पुणेकडे जाणाऱ्या वाहनांनी भोर किंवा इतर मार्गाचा वापर करावा, असे आवाहन चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी केले आहे.








