ढगाळ वातावरण, हवामानात बदल : पावसामुळे नागरिकांना दिलासा
बेळगाव : मागील चार दिवसांपासून बहुतांश भागात वळिवाने जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी दुपारी शहर परिसरात जोरदार सरी कोसळल्या. मात्र त्यानंतर पावसाचा जोर कायम राहिला नाही. मात्र या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वळीव पावसाबरोबर वातावरणातही बदल झाला असून ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे गारठा निर्माण झाला आहे. बुधवारी तालुक्याच्या काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वळीव बरसला होता. त्यानंतर महिनाभर वळिवाने पाठ फिरविली होती. पुन्हा आता वळीव सक्रिय झाला आहे. कमी जास्त प्रमाणात शहर आणि ग्रामीण भागात कोसळू लागला आहे.
जोरदार पावसाची प्रतीक्षा
मागील दोन दिवसांत कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला असला तरी अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मे महिन्यात म्हणावा तसा वळीव बरसला नाही. काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी अद्याप वळीव झालाच नाही. त्यामुळे वळिवाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विविध ठिकाणी नुकसान
सध्या होत असलेल्या वळीव पाऊस आणि वादळाने विविध ठिकाणी पडझड होऊ लागली आहे. झाडे, विद्युततारा, पत्रे, कवले आणि इतर साहित्याचे नुकसान होत आहे. विशेषत: पावसापेक्षा वाऱ्याचाच वेग अधिक असल्याने झाड्याच्या फांद्या कोसळून खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान होऊ लागले आहे.
शेतकरी सुखावला
पावसाने शेतकरी सुखावला आहे. पेरणीपूर्व मशागतीला पूरक वातावरण निर्माण झाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. येत्या काही दिवसात पेरणीपूर्व मशागतीलाही वेग येणार आहे. जिल्ह्यात पेरणीक्षेत्र अधिक असल्याने वळिवाचा पाऊस शेतकऱ्यांना दिलासादायक ठरला आहे.
पाणीटंचाईचा प्रश्न काहीअंशी मार्गी
शहर परिसरात झालेल्या वळिवाच्या पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागत आहे. शहरात पाच-सहा दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे. अशा परिस्थितीत अधूनमधून वळीव बरसत असल्यामुळे काहीअंशी समस्या कमी झाली आहे. त्याचबरोबर हिडकल आणि राकसकोप जलाशयाच्या परिसरात झालेल्या पावसाने पाणीपातळी टिकून आहे. त्यामुळे शहरातील पाण्याची समस्या कमी होणार आहे.









