स्वदेशी मालाला अधिक मागणी : रात्रीच्या वेळी बाजारपेठेतील दुकानांसमोर दिव्यांचा झगमगाट : विविध आकारातील दिवे विक्रीसाठी दाखल
बेळगाव : दिवाळी हा सण अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दिव्यांच्या खरेदीसाठी बेळगाव बाजारपेठेत गर्दी होत आहे. यावर्षी मातीच्या दिव्यांसोबतच अनेक रंगीबेरंगी विद्युतदिवे, माळा बाजारात दाखल झाल्या आहेत. रात्रीच्या वेळी बाजारपेठेतील दुकानांसमोर दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळत आहे. ग्राहकांची आवड ओळखून विविध आकारातील दिवे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. दिवाळी सण दोन दिवसांवर आल्याने खरेदीचा उत्साह दिसत आहे. बुधवारी सकाळी पाऊस झाल्याने सकाळच्या सत्रात बाजारपेठेत शुकशुकाट असला तरी सायंकाळनंतर गर्दी होण्यास सुरुवात झाली. केवळ शहराच्या मध्यवर्ती भागातच नाही तर उपनगरांमध्येही खरेदीचा उत्साह दिसून आला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली या भागात विद्युत दिवे व माळा विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. 30 रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंत विविध आकारातील दिवे व माळा विक्री केल्या जात आहेत. बेळगावसह गोवा व कोकणातील शेकडो नागरिक खरेदीसाठी तोबा गर्दी करत आहेत. झुंबर, विद्युत माळा, फळांच्या आकारातील माळा, लायटन, त्याचबरोबर एलईडी लाईट्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळीच्या काळात घरोघरी आकाश कंदील लावले जातात. या आकाश कंदिलांमध्ये लावण्यासाठी मल्टीकलर प्रकारातील बल्ब बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. गोल्डन कलरमधील एलईडी लाईट रात्रीच्या वेळी प्रखर उजेड देत असल्याने त्यांचीही खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर्षी एलईडी व देशी विद्युतमाळांना सर्वाधिक मागणी आहे.
स्वदेशी माळांना मागणी वाढली
बाजारात चायनीज एलईडी माळा विक्रीसाठी आल्या असल्या तरी बेळगावमध्ये हातांनी बनविलेल्या विद्युत माळांना सर्वाधिक मागणी आहे. चायनीज एलईडी माळांची किंमत कमी असली तरी स्वदेशी माळा टिकाऊ व मजबूत असल्याने नागरिकांची पसंती स्वदेशी विद्युत माळांना असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक महिलांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.









