जनरल-स्लीपर डब्यांची संख्या कमी, प्रवास ठरतोय त्रासदायक, वादावादीचे प्रकार
बेळगाव : बेळगाव परिसरातून दिल्लीला जाण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या वास्को-निजामुद्दिन एक्स्प्रेसमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडल्यानंतर जनरल व स्लीपर डब्यांची संख्या कमी झाली. यामुळे एक्स्प्रेसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. अनेक वेळा अपघातही होत असून रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. रात्रीच्यावेळी बेळगावमधून पुण्याला जाण्यासाठी ही एक्स्प्रेस महत्त्वाची ठरते. तसेच दिल्लीपर्यंत थेट प्रवास रेल्वेने करता येत असल्याने प्रवाशांची गर्दी असते. पूर्वी या एक्स्प्रेसला 4 जनरल, 9 स्लीपर, 2 टू-टायर, 4 थ्री-टायर एसी कोच होते. परंतु, प्रवाशांच्या मागणीनुसार अत्याधुनिक एलएचबी कोच जोडण्यात आले. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून नव्या एलएचबी कोच जोडण्यात आल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. जनरल डब्यामध्ये तर जनावरे भरल्याप्रमाणे प्रवासी प्रवास करतानाचे चित्र दिसून येत आहे.
सध्या या एक्स्प्रेसला 2 जनरल, 2 स्लीपर व इतर सर्व एसी कोच जोडले आहेत. जनरल व स्लीपर डब्यांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. जनरल डब्यांची संख्या कमी असल्याने हे प्रवासी आरक्षित स्लीपर डब्यातून प्रवास करत आहेत. यामुळे आरक्षण केलेले प्रवासी व इतर प्रवाशांमध्ये वादावादीचे प्रकारही होत आहेत. काही वेळा तिकीट तपासनीसांकडून दंडात्मक वसुलीही केली जात आहे. त्यामुळे स्लीपर व जनरल डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. सायंकाळी 5.30 वाजता बेळगावहून मुंबईला जाणाऱ्या दोन एक्स्प्रेस निघाल्यानंतर पुण्याला जाण्यासाठी गोवा एक्स्प्रेस हा एकमेव पर्याय राहतो. परंतु, वास्को, लोंढा या रेल्वेस्थानकांवरूनच फुल्ल भरून येते. असल्याने बेळगाव, मिरज येथील प्रवाशांना पाय ठेवण्यासही जागा नाही. त्यामुळे रेल्वेडब्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी होत आहे.









