रत्नागिरी :
आभाळ फाटल्यागत सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी जिह्याला झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे. खेडमधीतील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्ठी, संगमेश्वरमधील शास्त्राr, लांजामधील काजळी, राजापूरमधील कोदवली आणि संगमेश्वरमधील बावनदी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने लगतच्या परिसरातील घरे, दुकाने, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, जुलै 2021 नंतर प्रथमच चिपळुणातील वाशिष्ठी नदी इशारा पातळीवरुन वाहू लागल्याने अर्ध्या शहराला पुराला सामोरे जावे लागले. जिल्हाभरातून एसटीच्या तब्बल 168 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. जिह्यातील 26 गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. सागरी मासेमारी ठप्प आहे. जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी बुधवार 20 ऑगस्ट रोजीसुद्धा सुट्टी जाहीर केली आहे.
जगबुडी, शास्त्री, काजळी, कोदवली आणि बावनदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्यामुळे नदीलगतच्या परिसरातील घरे, बाजारपेठ, दुकानांना पुराच्या पाण्याने वेढा दिला तर काठावरील शेतीही पाण्याखाली गेल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे संगमेश्वरातील माखजन, रामपेठ आदी भागातील दुकानांमध्ये पुराचे पाणी भरल्याने नुकसान झाले आहे. पावसामुळे जिह्यातील नद्यांची सद्यस्थिती गंभीर असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सायंकाळी देण्यात आलेल्या अहवालानुसार दिसले. प्रमुख नद्या इशारा पातळी व धोका पातळीवरून वाहत असल्याने लगतच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदी सर्वात धोकादायक स्थितीत होती. ही नदी धोका पातळी 7.00 मीटरपेक्षाही 7.20 मी. या पातळीवरून वाहत होती. या नदीच्या परिसरातील पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि तातडीने बचावकार्य प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीने 5.48 मीटर ही इशारा पातळी गाठली होती. लांजातील काजळी नदी 16.55 मीटर या इशारा पातळीवरून वाहत होती. राजापुरातील कोदवली नदी 7.25 मीटर या इशारा पातळीवरून वाहत होती. तर संगमेश्वरातील बावनदीही 9.45 मीटर या इशारा पातळीवरून वाहत होती. संगमेश्वरातील शास्त्री, सोनवी, मुचकुंदी या नद्यांची पातळी सध्या तरी सुरक्षित आहे. परंतु सततच्या पावसामुळे त्यांची पातळीही वाढू शकते, असा अंदाज प्रशासन स्तरावरून वर्तवण्यात आला होता. या नद्यांच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- जनजीवन, वाहतुकीवर परिणाम
चिपळूण बाजारपेठ, मुरादपूर, चिंचनाका, वडनाका, आईस फॅक्टरी आणि पेठमाप, इंडियन जीम या भागात एक ते दीड फूट पाणी साचले. चिपळूण-कराड रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. राजापूरमधील जवाहर चौक, खडपेवाडी, मासळी मार्केट आणि वरचीपेठ परिसरात पाणी शिरले. रत्नागिरीतील हरचिरी, अंजणारी येथील रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
- बंद महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत
दापोली-खेड रस्ता बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. अणुस्कुरा घाटातील दरड हटवून वाहतूक सुरू झाली होती. दख्खन येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 वरील दरड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. चांदेराई पूल येथील काजळी नदीचे पाणी ओसरले असले तरी गावातील रस्त्यांवर पाणी असल्याने वाहतूक सायंकाळी बंद ठेवण्यात आली होती. येथे पुलावरील वाहतूक कुरतडेमार्गे सुरू आहे.
प्रशासनाची तयारी, बचावकार्य या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. चिपळूणमध्ये नगरपालिका, महसूल, पोलीस आणि एनडीआरएफची 11 पथके व 5 बोटी तैनात आहेत. राजापूरमध्ये नगरपरिषदेची सर्व यंत्रणा कार्यरत असून नागरिकांना स्पीकर व सायरनद्वारे सतर्क राहण्याचा इशारा दिला जात आहे. चिपळूणमधील कळंबस्ते गावातील 5 कुटुंबांना आणि जुवाड बेटावरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
- आज ‘ऑरेंज’ अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबईने जिह्यासाठी 19 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट देऊन अतिवृष्टीची शक्यता वर्तवली होती. 20 ऑगस्ट रोजी ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे. त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी जोरदार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांसाठी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचणे, कमकुवत झाडे उन्मळून पडणे, जुन्या इमारती कोसळणे, वाहतुकीत अडथळे येणे आणि पिकांना नुकसान पोहोचणे असे परिणाम अपेक्षित आहेत. नागरिकांनी प्रवास करण्यापूर्वी वाहतूक स्थिती तपासणे, कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळणे व विद्युत उपकरणांपासून दूर राहणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
- जिह्यात एसटीच्या 168 फेऱ्या पावसामुळे रद्द
जिह्यात मुसळधार पावसाचा एसटी महामंडळ रत्नागिरी विभागाला मोठा फटका बसला. मंगळवारी जिल्हाभरातून एसटीच्या तब्बल 168 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक 89 चिपळूण आगारातून, खेडमधून 22, मंडणगडमधून 19, दापोलीमधून 14, गुहागर 7, राजापूर 7, लांजा 3, रत्नागिरी 7 तर देवऊख आगारातून मात्र सर्व फेऱ्या सोडण्यात आल्या. तसेच जिह्यातून कुंभार्ली घाटमार्गे पुण्याकडे होणारी एसटीची वाहतूक थांबवण्यात आली आह़े रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमुळे एसटी रत्नागिरी विभागाला सुमारे 3 ते 4 लाख ऊपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
- जिह्यात 26 गावांमधील वीजपुरवठा खंडित
गेले 2 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे वीजखांब पडणे, वीजवाहिन्या तुटणे तसेच पूरक्षेत्रातील वीजखांब बंद करण्यात आल्याने जिह्यातील 26 गावांमधील वीजपुरवठा खंडित असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. रत्नागिरी मंडळ अंतर्गत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे जिह्यात प्रभावित फीडरची संख्या 99 तर बाधित एकूण गावांची संख्या 26 इतकी आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे 10 हजार 822 ग्राहक बाधित झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे 27 वीजखांब कोसळले असून हे खांब पुनर्स्थापित करण्याचे काम सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
- सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा
ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. ज्या संभाव्य नागरी वस्तीत पाणी भरण्याची शक्यता आहे, तेथील स्थलांतरणाबाबत नियोजन ठेवावे. कोणतीही घटना घडल्यास तत्काळ माहिती द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
- तालुकानिहाय पर्जन्यमान
19 ऑगस्ट रोजी सकाळी 8.37 पर्यंत, सर्वाधिक पाऊस राजापूर (185.12 मिमी), दापोली (181.85 मि.मी.) आणि खेड (172.14 मि.मी.) झाल्याची नोंद करण्यात आली. इतर तालुक्यांमध्ये: चिपळूण (162.44 मि.मी.), लांजा (166.50 मि.मी.), मंडणगड (147.75 मि.मी.), रत्नागिरी (140.55 मि.मी.), संगमेश्वर (138.08 मि.मी.) आणि गुहागर (130.60 मि.मी.) नोंद करण्यात आली. जिह्यात एकूण 1424.03 मि.मी पाऊस पडला असून जिह्याचा सरासरी पाऊस 158.22 मि.मी. आहे.








