वार्ताहर/तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात सोमवारी दमदार पावसाने हजेरी लावल्याने पाणीपातळीत दिवसभरातील 12 तासांच्या कालावधीत दोन फुटाने वाढ झाली आहे. रविवारी सकाळच्या 2452.50 फूट पाणीपातळीत सोमवारी सकाळी नाममात्र 0.30 फुटाने वाढ झाली. 2452.80 फूट इतकी नोंद झाली. रविवारी सकाळपासून जलाशयाला मिळणाऱ्या मार्यंडेय नदी पात्र आणि जांभूळ ओहळ नाल्यातून प्रवाह सुरू झाल्याने पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली. सोमवारच्या सकाळी नोंद झालेल्या पाणीपातळीत सायंकाळी 6 वाजता दोन फुटांने वाढ होत पाणीपातळी 2454 फुटांवर पोहोचली आहे. जलाशयाची खालची पाणीपातळी ही कमी विस्तारामुळे लवकर भरते. 2470 फुटापर्यंत जलाशय भरण्यास विस्तारामुळे जादा वेळ लागतो. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याची पाणीपातळी ही 2475 फूट आहे. पूर्ण क्षमतेने जलाशय भरण्यास अजूनही 20.60 फूट पाण्याची आवश्यता आहे.









