पावसाने फिरवली पाठ : रिमझिममुळे रोग वाढण्याची शक्यता
वार्ताहर/किणये
तालुक्यात अनंत चतुर्दशीपासून पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी सध्या जोरदार पावसाची गरज आहे. तालुक्यात सध्या केवळ पावसाची रिमझिम सुरू आहे. या रिमझिम पावसामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. गेल्या महिन्याभरापूर्वी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र गेल्या आठ दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. केवळ अधून मधून पावसाची रिमझिम होत आहे. भात व अन्य पिकांसाठी जोरदार पावसाची गरज आहे. तरच हे पीक चांगल्या दर्जाचे येऊ शकते. त्यामुळे जोरदार पाऊस पडण्याची आवश्यकता आहे. भातरोप लागवडीमध्ये सध्या शेतकरी खतांची मात्र देत आहेत.
काही शेतकऱ्यांनी धुळवाफ भातपेरणी केलेली आहे. हे पीकही बऱ्यापैकी बहरून आले आहे. मात्र भात पिकावर करपा रोग व किडीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. दमदार पाऊस झाल्यास रोग कमी होऊ शकतो. तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. जून महिन्याच्या मध्यांनंतर व जुलै महिन्यात या रताळी वेलीची लागवड केलेली आहे. या रताळी वेलीला खतांचा डोस शेतकऱ्यांनी दिलेला आहे. जमिनीत रताळी पीक मोठे होण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. याचबरोबर गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वीच नाचणा रोप लागवड केली आहे. या नाचणीच्या पिकासाठीही पावसाची आवश्यकता आहे. सध्या झालेला पाऊस बटाटा व भुईमूग या पिकांसाठी उपयुक्त ठरलेला आहे. तालुक्याच्या काही भागांमध्ये भुईमूग व बटाटा काढणी करण्यात येऊ लागली आहे. भात, नाचणी, रताळी व अन्य पिकांसाठी अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. असे शेतकरी सांगत आहेत.









