वार्ताहर /उचगाव
उचगाव परिसरात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमाराला वळिवाच्या पहिल्याच पावसाने अक्षरश: सर्वत्र झोडपून काढले. मुसळधार वृष्टीमुळे आणि गारांचा मारा यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर आंबा, काजू बागायतमधील जोरदार वाऱ्याचा आणि पावसाच्या तडाख्याने आंबे, काजू, मुरठे पडून बागायतदारांचेही मोठे नुकसान झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. चालूवर्षीच्या उन्हाळी हंगामामधील उष्णतेचा पारा अधिकच वाढला होता. मंगळवारी तर उष्णतेचा उच्चांक या भागात झाला होता. सगळीकडे लाहीलाही होत असतानाच सायंकाळी सहाच्या सुमाराला वादळी वाऱ्यासह आणि गारांसह मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. तर गावागावातून ग्रामपंचायतीनी गटारींची स्वच्छता न केल्याने गटारी याचबरोबर रस्त्यांच्या दुतर्फा साचलेला गाळ, माती, दगड यामुळे सर्वत्र पाणी तुंबून अनेक ठिकाणी घरातूनही पाणी शिरल्याचे चित्र दिसून येत होते. मुसळधार पावसाने सर्वत्र झोडपून काढल्याने भाजीपाला पिकांना पावसाने जीवदान दिले आहे.









