पेडण्यात दिवसभरात विक्रमी पावणे सहा इंच पाऊस
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात मान्सून सक्रिय झाला असून, मुसळधार पावसाने काल शनिवारी राज्याला झोडपले. दिवसभरात पेडणे तालुक्यात विक्रमी पाऊस झाला असून, सुमारे पावणे सहा इंच पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात सर्वाधिक पाऊस हा उत्तर गोवा जिह्यात झाला असून, पुढील तीन दिवस हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्याने सध्या ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. गोव्यात सरासरी दोन इंच पावसाची नोंद झाल्याने हवामान खात्याने शनिवारी दुपारनंतर एक दिवसासाठी रेड अलर्ट घोषित केला होता. दुपारनंतर राजधानी पणजीला पावसाने झोडपले. राज्यात जोरदार पाऊस बरसत असल्याने गेल्या 24 तासांत दोन इंच पाऊस पडला आहे. पेडणे तालुक्यात दिवसभरात सर्वाधिक पाऊस पडला असून, सुमारे सहा इंच पाऊस पडल्याने तालुका जलमय झाला. पुढील आठवड्यात गोव्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर आतापर्यंत काणकोण तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असला तरी वाळपई तालुक्यात शनिवारी दिवसभरात अगदी अल्प प्रमाणात पाऊस पडला आहे.
जोरदार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही वाढलेल्या आहेत. जोरदार पडलेल्या पावसामुळे राज्यातील प्रमुख शहरातील मार्केटवरही त्याचा परिणाम झाला. लोकांना जोरदार पावसामुळे छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर पडावे लागले. तर काही ठिकाणी अनेकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा घेतला.
दिवसभरातील पावसाची नोंद अशी : पेडणे पावणे सहा इंच, म्हापसा साडेतीन इंच, पणजी अडीच इंच, जुने गोवे सव्वा इंच, सांखळी अडीच इंच, फोंडा दीड इंच, धारबांदोडा अडीच इंच, काणकोण एक इंच, दाबोळी दीड इंच, मडगाव सव्वा इंच, मुरगाव सव्वा इंच, केपे 1 इंच, सांगे पावणे दोन इंच.









