सांबरा : तालुक्याच्या पूर्व भागाला शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पूर्व भागातील बसवण कुडची, शिंदोळी, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, मोदगा, सुळेभावी आदी भागाला शुक्रवारी जोरदार पावसाने झोडपून काढले. विजांच्या चमचमाटासह गारांचा वर्षावही झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. बसवण कुडची येथील सर्व्हिस रस्त्यावर विद्युत खांबासह झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शिंदोळी येथे यात्रेनिमित्त शुक्रवारी मोठ्या प्रमाणात जेवणावळीचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण पावसामुळे तेथील लोकांची आणि पाहुणे मंडळींची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यात्रेनिमित्त घातलेले काही मंडपही पावसामुळे जमीनदोस्त झाले. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.
सांबरा-मुतगा रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक कोंडी
सांबरा-मुतगा दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपाजवळ एक झाड रस्त्यावर उन्मळून पडले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. बघता बघता रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तासभर झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय झाली. शेवटी पोलीस व प्रवाशांनी झाड हटविले व रस्ता खुला केला.









