बेळगाव : गेल्या आठवड्याभरापासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी पुन्हा जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा काहीसा परिणाम बाजारपेठेवरही झाल्याचे दिसून आले. अचानक झालेल्या पावसामुळे दिवसभर ऊन असल्याने छत्री व रेनकोट न घेता बाहेर पडलेल्या नागरिकांना सायंकाळी भिजत जावे लागले. रविवारी सुटी असल्याने नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. पण सायंकाळी आलेल्या पावसामुळे नागरिकांसह विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली. ग्रामीण भागातही काहीवेळ पाऊस झाल्याने भात रोपलागवडीला पोषक वातावरण निर्माण झाले असून लागवडीला जोर येणार आहे.
आठवड्याभरात वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे. एकाच दिवशी वेगवेगळे वातावरण अनुभवयास मिळत आहे. पण यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. यासाठी नागरिकांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे. रविवारी दिवसभर ऊन होते. यामुळे नागरिक पावसापासून बचावासाठी छत्री व रेनकोट न घेता बाहेर पडले होते. पण सायंकाळी 5 नंतर झालेल्या पावसामुळे नागरिकांना समस्येचा सामना करावा लागला. परिणामी भिजत घरी जावे लागले. पावसाचा परिणाम विव्रेत्यांवरही झाला.
रोप लागवडीला वेग येणार
ग्रामीण भागामध्ये भाताची रोपलागवड जोरात सुरू असताना अचानक पावसाने रजा घेतल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले होते. रोप लागवडीला जास्त पाण्याची गरज असते. पण पावसाने विश्रांती घेतल्याने रोपे पुन्हा वाया जाण्याचा धोका निर्माण झाला होता. पण पावसाने हजेरी लावल्याने भात पिकाला पोषक वातावरण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची थोडीफार चिंता मिटली आहे. सध्या कडोली, अगसगा, हंदिगनूर भागात भाताची रोपलागवड करण्यात येत आहे. यासाठी पावसाची गरज होती. पण आता पाऊस होत असल्याने रोपलागवडीला वेग येणार आहे.









