उपनगरांमध्येही पाणीच पाणी : पावसाबद्दल तर्क-वितर्क

प्रतिनिधी /बेळगाव
मान्सून पावसामध्ये गडगडणे किंवा वीज कोसळणे असे प्रकार घडत नाहीत. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट होऊन पाऊस होत आहे. बुधवारी येळ्ळूर परिसरात गडगडून दमदार पाऊस कोसळला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी ढगांचा गडगडाट करत पावसाने शहरासह उपनगरांना झोडपले. या पावसाचा जोर इतका होता की सर्वत्र पाणीच पाणी झाले. जणू वळिवाचाच पाऊस कोसळल्याचा प्रत्यय साऱयांना आला.
शुक्रवारी मघा नक्षत्राचा शेवटचा दिवस होता. याचे वाहन घोडा आहे. त्यामुळे जणू घोडय़ासारखाच पाऊस बरसला. मघाच्या शेवटच्या दिवशी शहरासह उपनगरांमध्ये हा पाऊस झाला. शनिवार दि. 30 जुलैपासून पूर्वा नक्षत्राला सुरुवात होणार आहे. हे नक्षत्र 12 सप्टेंबरपर्यंत आहे. याचे वाहन मेंढा आहे. त्यामुळे आता पूर्वा नक्षत्र कोसळणार का? याकडे साऱयांचेच लक्ष लागले आहे.
शुक्रवारी सायंकाळीही दमदार सरी कोसळल्या. त्यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. जोरदार पाऊस पडत होता आणि त्यानंतर विश्रांती घेत होता. शुक्रवारी सकाळी मात्र उन्हाच्या तीव्र झळा पडल्या होत्या. उष्म्यामध्येही वाढ झाली होती. सध्या शेतकरी भात लावणीच्या कामामध्ये गुंतले आहेत.
दहा दिवसांपूर्वी दमदार मान्सून पाऊस झाल्यामुळे शेतकऱयांनी शेतामध्ये चिखल करून भात लावणीचे काम सुरू केले आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे भात लावणीच्या कामामध्ये काहीसा व्यत्यय निर्माण झाला. कारण शेतात पाणी असल्याशिवाय भातलावणी करणे अवघड जाते. त्यामुळे पावसाची नितांत गरज होती. आता काहीसा पाऊस कोसळत असल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
नागरिकांचे हाल….
शुक्रवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. श्रावण सुरू झाल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. मात्र पावसामुळे विपेते व खरेदीदारांना त्रास सहन करावा लागला.









