पणजी : गोव्यात गेल्या 24 तासांमध्ये पावसाने अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जोर धरला. म्हापसा येथे मुसळधार वृष्टी झाली. तिथे जवळपास 5 इंचापर्यंतची नोंद झाली. आगामी 48 तासांकरीता हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केले असून या काळात मेघगर्जनेसह जोरदार वृष्टी होईल, असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात फेंडा वगळता इतर सर्वत्र समाधानकारक पाऊस पडला. म्हापसा शहर व आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार ‘फलंदाजी’ केली. बुधवारी पहाटेपासून म्हापशात पावसाने बराच जोर धरला. त्यामुळे सकाळी म्हापसा शहराचा बराचसा परिसर जलमय झाला होता. सकाळपासून पाऊस सर्वत्र सुरू होता. त्यानंतर दुपारपासून पावसाने विश्रांती घेतली. गेले 4 दिवस पावसाचे प्रमाण फारच कमी झाले होते. मंगळवारी गोव्यात सर्वत्र हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आणि रात्री उशिरा पावसाने जोर धरला. बुधवारी सकाळी पणजीसह अनेक भागात मध्यम तथा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला.
गोव्यात बुधवारी स. 8.30 पर्यंत सर्वाधिक म्हापसा येथे पावणेपाच इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे 2.5 इंच, मुरगाव 2.5 इंच, जुने गोवे 1.75 इंच, दाबोळी 1 इंच, सांगे पाऊण इंच, काणकोण पाऊण इंच, पेडणे व सांखळी प्रत्येकी अर्धा इंच, मडगाव 1 सें. मी., धारबांदोडा व फोंडा येथे प्रत्येकी 1 से. मी. पेक्षाही कमी पावसाची नोंद झाली. गोव्यात गेल्या 24 तासांत नोंद झाल्यानुसार सरासरी सव्वा इंच पाऊस पडला. यंदाच्या मोसमात ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प झालेले असल्याने सध्या तरी सरासरी पेक्षा 5 टक्के पाऊस कमी पडलेला आहे. गोव्यात पुढील दोन दिवसांकरिता येलो अलर्ट जारी केले आहे. त्यादरम्यान मध्यम तथा हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र समुद्र खवळलेला राहिल. वाऱ्याचा वेग ताशी 55 ते 65 कि. मी. असा राहिल, असे हवामान खात्याने कळविले आहे.









