जोरदार वळिवाची प्रतीक्षा : पडझडीमुळे विद्युतखांब, वाहिन्या, टेलिफोन केबलचे मोठ्या प्रमाणात नुकसान: विद्युत पुरवठाही ठप्प
बेळगाव : उष्म्यात वाढ होऊन शुक्रवारी शहर परिसरात वळीव पावसाने कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून वळिवाने हुलकावणी दिली आहे. काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मात्र अद्याप जोरदार वळिवाची प्रतीक्षा लागली आहे. मागील काही दिवसांपासून पारा 38 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक उष्म्याने हैराण झाले आहेत. त्यामुळे वळिवाच्या पावसाची साऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. मात्र एप्रिल महिन्यात शहरात वळिवाने हुलकावणीच दिली आहे.
ग्रामीण भागातील काही भागात जोरदार पाऊस झाला असला तरी शहरात म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाला सुरुवात होत आहे. वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी वळिवाची गरज व्यक्त होत आहे. दुपारनंतर ढगांचा गडगडाट सुरू होता. मात्र पावसाला म्हणावा तसा जोर नव्हता. वादळी वाऱ्यामुळे शहर परिसरात पडझड झाली. झाडांची पडझड होऊन विद्युतखांब, वाहिन्या व टेलिफोन केबलचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे, फांद्या घरांवर कोसळून खासगी मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. पाऊस कमी मात्र वादळी वाऱ्यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
वडाच्या झाडाची फांदी वीजवाहिन्यांवर कोसळली
सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या वळिवाच्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळून हेस्कॉमचे नुकसान झाले. नार्वेकर गल्ली येथे वडाच्या झाडाची मोठी फांदी वीजवाहिन्यांवर कोसळली. यामुळे खडेबाजार, नार्वेकर गल्लीसह परिसरात वीजपुरवठा ठप्प होता. यामुळे काहीकाळ नागरिकांना अंधारात रहावे लागले. नार्वेकर गल्लीसह रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, सदाशिवनगर, काकतीवेस या परिसरात जुनाट वृक्ष व त्यांच्या फांद्या कोसळल्या. या फांद्या विद्युतवाहिन्यांवर कोसळल्याने ट्रान्स्फॉर्मर, तसेच वीजवाहिन्यांचे नुकसान झाले. सुरक्षेसाठी हेस्कॉमकडून वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. नार्वेकर गल्ली-खडेबाजार पोलीस स्थानकासमोरील झाडाची मोठी फांदी कोसळली. ही फांदी रस्त्यासोबतच समोरच्या कौलारू घरावरही कोसळल्याने घराचे नुकसान झाले. वीजवाहिन्या रस्त्यावर लोंबकळत असल्याने तात्काळ वीजपुरवठा बंद केला. यानंतर रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा ठप्प
शुक्रवारी वळिवाच्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. यामुळे वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा ठप्प होता. वाऱ्याचा जोर कमी झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत केला.









