भातपिकाला पाऊस उपयुक्त; शेतकऱ्यांतून समाधान
बेळगाव : मागील आठवड्यापासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा शहर व परिसरात हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ हवामान होते. अधूनमधून ढग निर्माण होत राहिल्याने पाऊस होणार अशी अटकळ बांधण्यात येत होती. दुपारी तीननंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शहराच्या काही भागात मोठा पाऊस तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे हवामानात बदल झाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. मागील 8 ते 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे नागरिक व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली.
बाजारपेठेतील व्यवहार विस्कळीत झाले. रेनकोट, छत्री सोबत घेऊन न आल्याने अनेकांना पावसामध्ये भिजतच व्यवहार करावे लागले. दरम्यान, शेतीसाठी पाऊस उपयुक्त ठरला आहे. उन्हामुळे कोमेजलेल्या भातपिकाला हा पाऊस उपयोगी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. शुक्रवारपासून हस्त नक्षत्रातील पावसाला सुरुवात झाली आहे. हे नक्षत्र 8 ऑक्टोबरपर्यंत आहे. जोरदार पाऊस हे हस्त नक्षत्राचे वैशिष्ट्या आहे. त्यामुळे आगामी काही दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज जाणकारांतून व्यक्त होत आहे.









