1 हजाराहून अधिक जण जखमी
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 657 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 1 हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते तैयब शाह यांनी अतिवृष्टी आणखी काळ सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानात चालू वर्षी पावसाचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 60 टक्क्यांपर्यंत अधिक राहिले आहे.
अतिवृष्टीमुळे यंदा प्रचंड नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी पूर आणि दुर्घटनांमुळे 657 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 171 मुले, 94 महिला आणि 392 पुरुषांचा समावेश आहे. पावसाशी निगडित सर्वाधिक बळी खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेले आहेत. येथे पावसामुळे घर कोसळणे किंवा अन्य दुर्घटनांमध्ये 394 जणांचा मृत्यू झाला असल्याचे तैयब शाह यांनी सांगितले आहे.
तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात 164 जणांना जीव गमवावा लागला आहे. सिंध प्रांतातही 28 बळी गेले आहेत. बलुचिस्तानात अतिवृष्टीमुळै 20 जणांचा मृत्यू झाला आहे. गिलगिट-बाल्टिस्तानात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर खैबर पख्तूनख्वाच्या बुनेर आणि शांगला जिल्ह्यांमध्ये सुमारे 150 लोक बेपत्ता आहेत. हे लोक मृत्युमुखी पडले असल्याची शक्यता आहे. केवळ बुनेर जिल्ह्यातच 84 जणांना जीव गमवावा लागला असून यातील 21 जण एकाच परिवारातील आहेत, जे ढगफूटीचे शिकार ठरले आहेत.









