पुणे / प्रतिनिधी :
उत्तरेकडील राज्यात पावसाचे थैमान सुरूच असून, पुढील दोन दिवस उत्तराखंड तसेच सिक्कीमला अतिवृष्टी, तर बिहार, उत्तरप्रदेश, आसामच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
उत्तरेकडील अनेक राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, बिहार, उत्तरप्रदेशसारख्या राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वोत्तर भारतात ब्रह्मपुत्रा नदी पात्र ओलांडून वाहत असून, आसाममध्येदेखील पूरस्थिती ओढावली आहे. देशभर सध्या मान्सून सक्रिय असल्याने या भागात जोरदार पाऊस होत आहे.
उत्तराखंड, सिक्कीममध्ये अतिवृष्टी
उत्तराखंडमध्ये गेले अनेक दिवस पावसाचा जोर आहे. शुक्रवारी राज्याच्या अनेक भागाला अतीवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सिक्कीममध्येही शुक्रवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये पाच दिवस पावसाचा जोर राहणार असून, त्यानंतर त्याचे प्रमाण कमी होणार आहे. बिहार, उत्तरप्रदेश, आसाम, सिक्कीमध्ये शुक्रवारनंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. याशिवाय देशभर सध्या पावसाचा यलो अलर्ट आहे.
देशभर पावसाने सरासरी ओलांडली
दरम्यान, देशाच्या विविध भागांत होत असलेल्या पावसामुळे मान्सूनने 1 जून ते 12 जुलैच्या दरम्यानची सरासरी ओलांडली आहे. देशभरात सर्वसाधारणपणे या कालावधीत 266.9 मिमी इतका पाऊस होतो, आतापर्यंत मात्र 271.3 मिमी पाऊस होत सरासरीच्या 1 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्रात यलो अलर्ट
महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहण्याची शक्यता आहे.









