शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामध्ये गारांचा पाऊस पडला. तर काही ठिकाणी गारांच्या लाद्या पडल्याने अनेक ठिकाणी शेतीचे अतोनात नुकसान झाले.
करवीर तालुक्यातील वाकरे, खुपीरे, कुडित्रे, दोनवडे या गावातील परिक्षेत्रामध्ये हा जोरदार पाऊस होऊन पिकांचे जोरदार नुकसान झाले. साधारण दिड तास चाललेल्या गारांच्या पावसामुळे सुमारे 32 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. गारांच्या पावसानंतरही सुमारे 12 तास गारा विरघळल्या नव्हत्या.
वाकरे गावात या गारपीटीमुळे सुमारे दहा हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये प्रामुख्याने मका, भाजीपाला, उस या पिकांचा समावेश आहे. वाकऱ्यात गारांच्या मोठमोठ्या लाद्या पडलेल्या असून 12 तासांनंतरही या लाद्या विरघळलेल्या नाहीत. तर कोपार्डे येथे सुमारे 10 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे उस पिकाला ही मोठा फटका बसला आहे.