बुधवारीपर्यंत रेड अलर्ट : एनएच 56 राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 पाण्याखाली : होन्नावरमध्ये झाडे कोसळून घरांचे नुकसान
कारवार : कारवार जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मंगळवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दि. 5 पासून दि. 7 पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारी भटकळ येथे 112 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे भटकळ शहराजवळील रंगीनकट्टे, समशुद्दीन सर्कल आणि शिराली येथील एनएच 56 राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 हा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भटकळ तालुक्याच्या वाहतुकीत व्यत्यय निर्माण होऊन जनजीवन ठप्प झाले आहे. होन्नावर येथील प्रभातनगरमधील प्रकाश मेस्ता आणि मेलकोड येथील मनिकंठ नाईक यांच्या घरावर नारळाची झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांना तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
यावर्षीच्या जिल्ह्यातील पावसाचे वर्णन किनारपट्टीवरील तालुक्यात जोमात आणि घाटमाथ्यावरील तालुक्यात कोमात असे करावे लागले. राज्यातील अति पाऊस पडणारा जिल्हा म्हणून कारवार जिल्हा ओळखला जातो. किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ या पाच तालुक्यात प्रत्येक वर्षी विक्रमी पावसाची नोंद होत असते. किनारपट्टीवरील तालुक्याच्या तुलनेत घाटमाथ्यावरील जोयडा, दांडेली, शिरसी, सिद्धापूर आणि यल्लापूर या पाच तालुक्यातील पावसाचे प्रमाण थोडे कमी असते तर हल्याळ आणि मुंदगोड या दोन तालुक्यातील पावसाचे प्रमाण आणखी कमी असते. यावर्षी अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पावसाचे आगमन उशिरा झाले. जिल्ह्यात पावसाला सुरुवात होऊन उणेपुरे दिवस लोटले आहेत. तथापि यावर्षी जिल्ह्याच्या किनारपट्टीला झोडपून काढणाऱ्या पावसाने घाटमाथ्यावरील तालुक्याकडे पाठ फिरवली आहे.
वास्तविक किनारपट्टीवरील तालुक्याच्या बरोबरीने जोयडा, दांडेली, शिरसी, सिद्धापूर आणि यल्लापूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होणे गरजेचे आहे. कारण या तालुक्यात होणाऱ्या पावसावर भात, उसासह मोठ्या प्रमाणात घेण्यात येणाऱ्या सुपारी आदी पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. इतकेच नव्हे तर याच तालुक्यात होणाऱ्या पावसावर गणेशगुढी, बोम्मनहळ्ळी, तट्टीहळ्ळा, कद्रा कोडसळ्ळी, गिरसप्पा धरणांचे भवितव्य अवलंबून असते. आणि या धरणातील पाण्यावर सुपा, अंबिकानगर, कद्रा, कोडसळी, गिरसप्पा येथील जलऊर्जा निर्मिती अवलंबून असते. यावर्षी घाटमाथ्यावरील तालुक्यातील पावसाचे प्रमाण भलतेच कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या बरोबरीने कर्नाटक विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सर्वस्वी शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या मुंदगोड तालुक्यात तर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाले, ओढे अद्याप प्रवाहित नाहीत
अपुऱ्या पावसामुळे घाटमाथ्यावरील तालुक्यातील नाले, ओढे अद्याप प्रवाहित झालेले नाहीत. त्यामुळे या तालुक्यामध्ये प्रत्येक वर्षी दिसून येणारी निसर्गरम्य आणि विहंगम दृश्ये जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर किनारपट्टीवरील विशेष करुन कारवार तालुक्यातील पश्चिम भागातील नाले, ओढे अद्याप प्रभावीत झालेली नाहीत.
वर्षापर्यटनाला खीळ
यावर्षी घाटमाथ्यावरील तालुक्यातील नाले आणि ओढेच प्रवाहित न झाल्याने धबधब्यांना अद्याप जीवच आलेला नाही. त्यामुळे वर्षा पर्यटनाला खीळ बसून या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांची पंचाईत झाली आहे.
पाच तालुक्यातील शाळांना आज सुटी
कारवार जिल्ह्यातील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ या किनारपट्टीवरील पाच तालुक्यात अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे प्राथमिक, माध्यमिक शाळा व पदवीपूर्व महाविद्यालयांना बुधवारी एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, डिग्री आणि डिप्लोमा कॉलेज सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रभुलिंग कवळीकट्टी यांनी दिली आहे.
किनारपट्टीवर जोर अन् घाटमाथ्यावरील तालुक्यात कमजोर
दरम्यान मंगळवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 619 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच कालावधीत तालुकानिहाय झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे (सर्व आकडेवारी मि.मी. मध्ये) – अंकोला 120, भटकळ, 126, दांडेली 5.4, होन्नावर 88, कारवार 72, कुमठा 127, शिरसी 17, सिद्धापूर 9.2, जोयडा 11.4, यल्लापूर 19, मुंदगोड हल्याळ 2.4.









