सात दिवसात 1229 मि. मी. विक्रमी पाऊस : नदी-नाल्यांनी पातळी ओलांडली, सतर्कतेचा इशारा
वार्ताहर /कणकुंबी
जिह्यातील अतिवृष्टीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकुंबी येथे गेल्या आठवड्यात म्हणजे दि. 19 ते दि 25 जुलैपर्यंत सात दिवसांत 1229 मि. मीटर असा या वर्षातील विक्रमी पाऊस झाला आहे. तर जुलै महिन्यात अद्याप दि. 25 पर्यंत एकूण 2380 मि. मी. पावसाची नोंद कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे.
गेले आठ दिवस कणकुंबी भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. हब्बनहट्टी येथे मलप्रभा नदीच्या पात्रात असलेले श्री स्वयंभू माऊती मंदिर दुसऱ्यावेळी पाण्याखाली गेले आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व लहान-मोठे नाले तुडुंब भरून वाहत असल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. या भागातील काही विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी आठ ते दहा किलोमीटर पायपीट करून जंगलातून यावे लागते. याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर करून विद्यार्थ्यांवर कृपादृष्टीच केली आहे. कणकुंबी भागातील काही विद्यार्थ्यांना नदी-नाले पार करून घनदाट जंगलातून येताना जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला होता. परंतु जिल्हाधिकारी व शिक्षण खात्याने घेतलेल्या सुटीच्या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधान पसरले आहे.
जून महिन्यात केवळ 465.8 एवढाच पाऊस झाला होता. 1 जूनपासून अद्याप 25 जुलैपर्यंत 2990 मिलिमीटर पावसाची नोंद कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे. जून महिन्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्याने ही नोंद अल्पशी ठरली आहे. फक्त बेळगावच नाहीतर उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून कणकुंबीची ओळख आहे. वर्षाकाठी कमीतकमी या ठिकाणी पाच ते सहा हजार मिलिमीटर पाऊस होत असतो. परंतु यावषी मात्र जून महिन्यात केवळ 465.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सुऊवातीचे पंधरा दिवस पावसाचा एक थेंबही पडला नाही. त्यानंतर मात्र थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने जून महिन्यात केवळ 465 मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या काही वर्षातील जून महिन्यामधील ही नोंद निच्चांकी समजली जाते.
कणकुंबी भाग चार दिवसांपासून अंधारात
जांबोटीहून पुढील भागातील सर्व गावे गेली चार-पाच दिवस अंधारात आहेत. विशेषत: आमटे, गोल्याळी, कणकुंबी,पारवाड ग्रा.पं.मधील सर्व गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित म्हणण्याऐवजी कणकुंबी भागातून वीज गायबच झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावषीसुद्धा जून महिन्यात खंडित विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
जुलैमध्ये 2380 मिलिमीटर पाऊस
कणकुंबी येथील पर्जन्यमापक केंद्रात 1 जुलै ते 25 जुलैपर्यंत अद्याप 2380 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मलप्रभा नदीचे उगमस्थान पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेले असून, परिसरातील सर्व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जुलै महिन्यात दि. 18 रोजी 235 मि. मी. तर 20 रोजी 219 मि. मी. पाऊस झालेला आहे. एका आठवड्यात 1229 मी. मी पाऊस झाल्याने संपूर्ण परिसर गारठून गेला आहे. मंगळवारी देखील दिवसभर पावसाने झोडपून काढल्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नंदगड जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग
नंदगड येथील जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. गेल्या चार दिवसापासून कित्येक क्मयुसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी तट्टी नाल्यातून बिडी गस्टोळी परिसरात जाते. गेले चार दिवस शाळांना सुटी असल्याने पालकांसह मुले जलाशयातून विसर्ग होण्याचे पाणी पाहण्यासाठी व त्यात आंघोळ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. नंदगड गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हा जलाशय आहे. जलाशयाच्या बांधाजवळून आनंदगड किल्ल्याला जाण्यासाठी वाट आहे. आनंदगड किल्ला व दुर्गादेवी दर्शनासाठी जाणारे अनेक भाविक या रस्त्यावरून जातात. तर काहीजण जलाशयाच्या बांधावरून जातात. त्यामुळे नंदगड व परिसरातील जनतेला जलाशयाचा नेहमीच संपर्क येतो. त्यातच या जलाशयाच्या पाण्यावर नंदगड, क. नंदगड परिसरातील जमीन अवलंबून आहे. जलाशयाच्या कालव्याद्वारे ऐनवेळी पाण्याचा पुरवठा केला जातो. जलाशयातील अतिरिक्त पाणी जाण्यासाठी व्यवस्था केली आहे. सध्या जलाशयात अतिरिक्त पाणी झाल्याने पाण्याचा विसर्ग होत आहे.
नंदगड कब्बीन तलावाच्या बांधाला भगदाड
नंदगड गावच्या पश्चिमेला असलेल्या कब्बीन तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे परिणामी सोमवारी रात्री तलावाच्या बांधाला भगदाड पडले. मंगळवारी सकाळी तलावाच्या बांधावरुन शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आली. या तलावाच्या बांधाच्या लगत शेतवडी असलेले शेतकरी एकत्र आले. त्यांनी ही घटना ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा गुरव यांना सांगितली. त्यांनी ग्रा. पं. चे कर्मचारी, ग्रामस्थ व शेतकरी सर्वांनी मिळून सोमवारी सायंकाळपर्यंत मुरूम व माती घालून भगदाड बुजविले. ग्रा. पं. चे आजी-माजी सदस्यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. तलावाचा बांध फुटल्यास परिणामी दोनशे एकर जमिनीतील भात व ऊस पिकांचे नुकसान झाले असते. ग्रा. पं. ने व संबंधित शेतकऱ्यांनी वेळीच दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे अनर्थ टळला आहे. बांधावरील भगदाडावर माती टाकून तात्पुरती दुरुस्ती केल्याबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होंत आहे.









