वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-ओलमणी परिसराला मंगळवारी सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार वळीव पावसाने झोडपल्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. शिवाय या हंगामातील पहिलाच वळीव पाऊस असल्यामुळे नागरिकांची काही प्रमाणात तारांबळ उडाली. गेल्या दोन-चार दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला होता. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. उष्म्यापासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते. अपेक्षेप्रमाणे मंगळवारी दुपारी या परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन, ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.
तसेच दुपारी 12 वाजल्यापासूनच या भागात मेघगर्जना व ढगांच्या गडगडाट सुरू झाल्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. दुपारी तीनच्या दरम्यान या परिसरात पावसाचा केवळ शिडकावा झाला. मात्र सायंकाळी 6 वाजता या परिसराला मुसळधार वळिवाने झोडपून काढल्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे जांबोटी-खानापूर महामार्गावरील शंकरपेठ नजीकच्या मलप्रभा नदीतील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली होती. या ठिकाणाहून पाण्यातून वाट काढत वाहने चालविताना वाहनधारकांची मोठ्याप्रमाणात तारांबळ उडाली. पावसामुळे भागातील वीजपुरवठा रात्रभर गायब झाल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.









