अनेक नद्यांना पूर : गृहमंत्र्यांनी केली हवाई पाहणी
वृत्तसंस्था/ गांधीनगर
बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या रात्री गुजरातमधील कच्छच्या किनारपट्टीवर धडकले. वादळाच्या तडाख्यानंतर अजूनही बाधित भागात जोरदार पाऊस सुरू आहे. सौराष्ट्र-कच्छसह उत्तर गुजरातमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून पालनपूर, थाराड, पाटण, बनासकांठा आणि अंबाजी जिह्यातील अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नद्यांना पूर आल्याने पाटणमधील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव आता ओसरत चालला असून येत्या 12 तासात ते आणखीनच कमकुवत होण्याची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बिपरजॉय या चक्रीवादळाने पश्चिम भारताबरोबरच आग्नेय पाकिस्तानमध्ये दणका दिला आहे. गुजरातमधील पाटण येथील सर्वात मोठ्या चरणका सोलर प्लान्टचे वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर यंत्रणांनी वादळामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अजूनही ही पथके मदत व बचावकार्यात सक्रियपणे सहभागी असून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. दरम्यान, वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी कच्छ परिसराची हवाई पाहणी केली. तसेच मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही होते.
बनासकांठा जिह्यात शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानंतर बनास नदीचे पाणी अबू रस्त्यापर्यंत पोहोचले आहे. पालनपूर-अंबाजी महामार्ग बंद करण्यात आला आहे. कित्येक गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. त्याचबरोबर पालनपूर शहरातील अनेक भागही पाण्याखाली गेले आहेत. शक्तीपीठ अंबाजीत पुरामुळे राजस्थान आणि गुजरातच्या अनेक शहरांतून येणाऱ्या भाविकांना मध्यमार्गी परत पाठवण्यात येत आहे. थाराड शहरात ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहत असल्यामुळे शहरातील बऱ्याच घरांचे शेड, दुकाने, होर्डिंग आदींचे नुकसान झाले आहे. अनेक भागात विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. शहरातील बहुतांश भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते.
बिपरजॉयच्या काळात 700 मुलांचा जन्म
चक्रीवादळाच्या काळात बचाव शिबिरात 700 हून अधिक मुलांचा जन्म झाला. वादळाच्या 72 तास आधी गुजरात सरकारने 8 अतिजोखमीच्या जिह्यातील सुमारे 1 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवत छावण्यांमध्ये पाठवले होते. यामध्ये 1,152 गर्भवती महिलांचा समावेश होता. त्यापैकी 707 महिलांची रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये प्रसुती झाली. वादळाच्या वेळी 302 सरकारी वाहने आणि 202 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिकांमध्ये वैद्यकीय कर्मचारीही होते.