नदी-नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले : राकसकोप जलाशयातून पाण्याचा विसर्ग : मार्कंडेय नदीला पूर आल्याने शेती पाण्याखाली
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी-नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागले आहेत. सोमवारी दिवसभर संततधार पावसामुळे कमालीचा गारठा निर्माण झाला असून जनजीवन गारठले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाचे दोन दरवाजे 9 इंचाने उघडण्यात आले आहेत. तीन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मार्कंडेय नदीला पूर आला आहे. परिणामी दुसऱ्यांदा मार्कंडेय नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. 16 ऑगस्टपासून मघा नक्षत्राला सुरुवात झाली आहे. नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेष करून रविवारी रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे खानापूरसह काही तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुटी जाहीर केली आहे. तसेच असाच पाऊस सुरू राहिल्यास पुन्हा पूरपरिस्थितीला सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य धोका ओळखून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची क्षमता 2478 फूट इतकी आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने जलाशयात पाण्याची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे शनिवारी दरवाजे क्र. 2 व 5 हे पाच इंचांनी उघडण्यात आले होते. रविवारी परत दोन इंचांनी उचलण्यात आले. तर सोमवारी सकाळी आणखी दोन इंचांनी दरवाजे उचलण्यात आले. एकूण 9 इंचांनी पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मार्कंडेय नदीला पूर आला आहे. परिणामी नदीकाठची शेती दुसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे. यापूर्वी पाण्याखाली गेलेले भातपीक खराब झाल्याने शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा लागवड केली होती. पुन्हा पुरा पाण्याखाली शेती गेल्याने भातपीक खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी चार दिवस पाऊस आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गणेशभक्तांतून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.
वातावरणात प्रचंड गारठा
पावसाची रिपरीप कायम असल्याने वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात थंड वारे वाहू लागले आहेत. पावसासह थंडीच्या लाटेमुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत.तसेच वातावरणात अचानक बदल झाल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने ऐन गणेशोत्सवात बाजारपेठेवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रविवारी आणि सोमवारी बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी रोडावल्याचे दिसून आले.
घरांची पडझड
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील घरांची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तलाठी, ग्राम पंचायत पीडीओ, सेक्रेटरी व महसूल अधिकारी नुकसानग्रस्त घरांना भेटी देऊन पंचनामे उरकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सोमवारी गोंधळी गल्लीतील बाळकृष्ण जाधव यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. पावसाने मध्यंतरी उघडीप दिली होती. बरेच दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. खरीप हंगामातील पिकांना कूपनलिका तसेच विहिरींच्या माध्यमातून पाणी देण्यात येत होते. यापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला होता. मात्र, बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती.
यावेळी राज्य सरकारकडून घर कोसळून नुकसान झालेल्यांना आर्थिक नुकसानभरपाई दिली जात आहे. पूर्णपणे घर कोसळल्यास एक लाख रुपये तर घराचा काही भाग कोसळल्यास टक्केवारीनुसार नुकसानभरपाई दिली जात आहे. मात्र, यासाठी तलाठी किंवा ग्राम पंचायतीच्या माध्यमातून पंचनामा करून कायदेशीर सोपस्कार पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतर संबंधितांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम जमा केली जात आहे. सोमवारी गोंधळी गल्लीतील बाळकृष्ण जाधव यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गणाचारी गल्लीतील एका जुन्या घराची भिंतदेखील रस्त्यावरच कोसळली आहे. सदर भिंत अर्धवट कोसळली असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला तसेच वाहनांना धोका निर्माण झाली आहे. गणेशोत्सवावेळी देखावे पाहण्यासाठी या रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे महानगरपालिकेने ही भिंत पूर्णपणे पाडून सुरक्षितता प्रदान करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
घटप्रभा-हिरण्यकेशी नदीकाठावर सावधानतेचा प्रशासनाचा इशारा, हिडकल जलाशयातून विसर्ग वाढवल्याने सतर्कतेचे आवाहन
पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे हिडकल जलाशय तुडुंब भरले आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी सोमवारी घटप्रभा नदीत सोडण्यात आले आहे. नदीपात्राजवळील गावांना पुराचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. यासंबंधी हिडकल डॅम येथील साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. महसूल, पोलीस अधिकाऱ्यांना संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खासकरून नदीपात्रावरील शेतकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हिडकल जलाशयात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत जलाशय 99.8 टक्के भरला आहे. 13 हजार 337 क्युसेक पाणी जलाशयात येत आहे. त्यामुळे सोमवारी जलाशयाचे दरवाजे उघडून 6 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. जलाशयात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन 20 हजार क्युसेकपर्यंत पाणी घटप्रभा नदीत सोडण्यात येणार आहे. यामुळे घटप्रभा व हिरण्यकेशी नदीकाठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
विद्यार्थी शाळेत आल्यानंतर जाहीर केली सुटी : जिल्हा प्रशासनाच्या निर्णयामुळे पालकांमध्ये नाराजी, अनेकांची तारांबळ
मुसळधार पावसाचे कारण देत जिल्हा प्रशासनाने बेळगाव शहरासह काही तालुक्यांतील शाळांना सोमवारी सकाळी सुटी जाहीर केली. परंतु विद्यार्थी शाळेत पोहोचल्यानंतर सुटी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांची तारांबळ उडाली. रिक्षामामांचीही दमछाक झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने किमान रविवारी रात्री सुटी जाहीर केली असती तर पालकांची धावपळ झाली नसती. या प्रकारामुळे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ याची प्रचिती पालकांना आली. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. श्रावणातील शेवटचा सोमवार असल्यामुळे बऱ्याचशा सरकारी शाळांना सोमवारी स्थानिक सुटी देण्यात आली होती. तर विनाअनुदानित व खासगी शाळा अर्धा दिवस भरविल्या जाणार होत्या. बेळगाव व खानापूर तालुक्यात रविवारी रात्रभर पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले. त्यामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सोमवारी सकाळी 7 वाजून 39 मिनिटांनी सुटी जाहीर केली.
अनेक खासगी शाळा सकाळी 8 वा. भरविल्या जात असल्याने विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचले. शाळांनी सुट्टी जाहीर झाल्याची माहिती पालकांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर देण्यात आली. परंतु सकाळी मुलांना शाळेत पोहोचविण्याची घाई असल्याने बऱ्याचशा पालकांनी ही माहिती न पाहिल्याने विद्यार्थी व पालक शाळांमध्ये दाखल झाले. शाळेच्या दारात त्यांना प्रशासनाने शाळेला सुटी दिल्याचे समजले. यामुळे पालकांनी शाळा प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला. सुटी द्यायचीच होती तर त्याची आदल्यादिवशी घोषणा करणे गरजेचे होते. घडलेल्या प्रकारामुळे पालकांची बरीच तारांबळ उडाली. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कार्यालयात पोहोचण्यासाठी पालकांची धावपळ सुरु असताना शाळेला सुटी देण्यात आल्याने मुलांना पुन्हा घरी सोडावे लागले. रिक्षामामांनाही पुन्हा माघारी फिरावे लागल्याचे दिसून आले. काही विद्यार्थी खानापूर, हुदली परिसरातून बेळगावमध्ये शाळेसाठी आले होते. त्यामुळे त्यांना निष्कारण हेलपाटा पडला. परिणामी सुट्टी दिली नसती तर चालले असते. म्हणण्याची वेळ पालकवर्गावर आली.
पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांची ओढाताण
पावसाचा अंदाज हवामान खाते वगळता कोणालाही देता येत नाही. मुसळधार पावसामुळे शाळांना सुटी देण्याबाबतचा निर्णय आदल्या दिवशी जाहीर करणे हे सर्वांच्या सोयीचे ठरते. सोमवारी पडणाऱ्या पावसामुळे सकाळी सुटी जाहीर केल्याने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. अशा वेळी निर्णय न देणे अधिक उचित ठरते. पावसाचा अंदाज घेऊन पालकच मुलांना शाळेला पाठविण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. किंवा मुले शाळेत पोहोचल्यावर शाळा वर्ग घेऊन दिवस भरुन काढू शकते. परंतु सुट्टी आहे-नाही या संभ्रमाच्या वातावरणामुळे पालक, शिक्षक यांच्याबरोबरच विद्यार्थ्यांचीही ओढाताण होते.
शाळा, पदवीपूर्व महाविद्यालयांना आज सुटी
बेळगावमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवार दि. 19 रोजी शाळा व पदवीपूर्व कॉलेजना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुटीचे आदेश दिले आहेत. बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, कित्तूर, रामदुर्ग, सौंदत्ती या तालुक्यांमध्ये शाळांसह पदवीपूर्व कॉलेजना सुटी देण्यात आली आहे. ज्या भागात पावसाचा जोर कमी आहे, अशा तालुक्यांमध्ये केवळ अंगणवाडी व माध्यमिक शाळांना सुटी देण्यात आली आहे. चिकोडी व हुक्केरी तालुक्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे. बेळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे सखल भागामध्ये पाणी शिरले असून दुर्गम भागातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुटी जाहीर केली आहे.









