शेतीत पाणी साचल्याने आवक मंदावली : दरात वाढ
बेळगाव : मागील आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले आणि जलाशयांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी शिवारात पाणी साचून पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. विशेषत: भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दरही वाढू लागले आहेत. जिल्ह्यात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने नदीकाठावरील पिकांना फटका बसला आहे. भाजीपाला, फळभाजा आणि कांदा पिकात पुराचे पाणी शिरल्याने अडचणी वाढल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे भाजीपाला बाजारात येत नसल्याने आवक मंदावली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांबरोबर ग्राहकांनाही फटका बसू लागला आहे.
दररोज 15 ते 17 हजार क्विंटल भाजीपाल्याची गरज
बेळगाव आणि चिकोडी परिसरात सुमारे 9546 हेक्टर क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाला पीक उद्धवस्त झाले आहे. उत्पादनात मोठी घट झाल्याने भाज्यांचे दर 70 ते 80 रुपये प्रति किलो झाले आहे. बेळगाव शहरात 51 हजारहून अधिक लहानमोठे हॉटेल्स आहेत. त्याबरोबर कॅन्टींन, बार, रेस्टारंट यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे शहराला दररोज 15 ते 17 हजार क्विंटल भाजीपाल्याची गरज भासते. मात्र पावसाची संततधार कायम असल्याने भाजीपाला उत्पादकांना फटका बसला आहे.
घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली
भाजीपाला पिकात पाणी शिरल्याने बाजारात भाजीपाल्याची कमतरता जाणू लागली आहे. त्याबरोबर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याची वाहतूकही थांबली आहे. परिणामी घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावताना दिसत आहे. त्यामुळे दरात वाढ होऊ लागली आहे.









