बेळगाव जिल्ह्यात 2 हजार विद्युतखांब कोसळले, 60 ट्रान्स्फॉर्मर निकामी
बेळगाव : बेळगावसह उत्तर कर्नाटकात झालेल्या मुसळधार पावसामुळे हेस्कॉमला जोरदार फटका बसला. 14 कोटी 85 लाखांचे नुकसान झाले आहे. वीजखांब, ट्रान्स्फॉर्मर तसेच वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मे महिन्याच्या अखेरपासून झालेल्या वादळी पावसामुळे हे नुकसान झाले आहे. हेस्कॉमच्या अखत्यारीतील बेळगाव, धारवाड, गदग, उत्तर कन्नड, बागलकोट, विजापूर व हावेरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे नुकसान झाले. बेळगाव जिल्ह्यात 2 हजार 16 विद्युत खांब कोसळले. तर 60 ट्रान्स्फॉर्मर वीज पडून निकामी झाले आहेत. याबरोबरच बाजूच्या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वीजखांब, वाहिन्या तसेच ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान झाले आहे.
मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी नुकसान कमी झाले असले तरी वीजखांब कोसळण्याची संख्या मात्र वाढली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जुनाट वृक्ष व त्यांच्या फांद्या कोसळून विद्युतखांबांचे नुकसान झाले. बेळगाव शहरासह तालुक्यातही वीजखांबांचे नुकसान झाले होते. त्यामुळे काही काळ वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मे महिन्याच्या अखेरपासून जून महिन्याच्या अखेरपर्यंत धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वाधिक फटका वीजव्यवस्थेला बसला. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हेस्कॉमने कंत्राटी कामगारांना कामावर घेऊन नवीन वीजखांब बसवण्यासोबत नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवले.









