पुणे / प्रतिनिधी :
नैऋत्य मोसमी वारे देशभर सक्रिय झाले असून, पुढील चार ते पाच दिवस सर्वदूर मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकत छत्तीसगड व लगतच्या भागावर आहे. हे क्षेत्र पुढे मध्य प्रदेशकडे वळेल, दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत ट्रफ पसरला आहे, राजस्थान ते उत्तरपूर्व बंगालच्या उपसागरादरम्यान पूर्व-पश्चिम ट्रफ पसरला आहे, दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीजवळ हवेची द्रोणीय स्थिती आहे. या सर्व घटकांमुळे देशभर मान्सून सक्रिय झाला असून, पुढील पाच दिवस वायव्य भारत, मध्य तसेच पश्चिम भारतात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पूर्वोत्तर भारतात मुसळधार
वरील सर्व घटकांमुळे पुढील तीन ते चार दिवस राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम या राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मध्य, वायव्य व पश्चिम किनारपट्टी, पूर्वोत्तर भारतातील अनेक राज्यांना यलो अलर्ट आहे.
महाराष्ट्राला अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
गेले दोन दिवस राज्यात दमदार पाऊस होत आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बळीराजासह सर्वांना दिलासा मिळाला आहे. कोकण-गोव्यात पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. समुद्रही खवळलेला राहणार असून, जोरदार वारे वाहण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
ट्रफ पसरल्याने पाऊस सक्रिय
दक्षिण गुजरात ते केरळपर्यंत ट्रफ पसरल्याने राज्यात मान्सून सक्रिय झाला असून, सर्वदूर पाऊस होत आहे. त्यातही कोकण गोव्यात पुढील चार ते पाच दिवस तुफान पावसाचा अंदाज आहे. याबरोबरच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा नाशिक या घाट क्षेत्रातही मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेची सूचना हवामान विभागाने जारी केली आहे.
मराठवाडा, विदर्भात पाऊस
विदर्भातही यलो अलर्ट असून, दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मान्सून पुढे सरकला
मान्सूनची घोडदौड सुरुच असून, मंगळवारी त्याने संपूर्ण गुजरात व्यापत, राजस्थानचा आणखी काही भाग काबीज केला. येत्या दोन दिवसांत तो राजस्थान, पंजाब व हरियाणाचा उर्वरित भाग व्यापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील अलर्टवरील जिल्हे
बुधवार : ऑरेंज अलर्ट – मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस
पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
बुधवार : यलो अलर्ट : दमदार पाऊस
ठाणे, मुंबई, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम
गुरुवार : ऑरेंज अलर्ट
पालघर, रायगड, पुणे
गुरुवार : यलो अलर्ट
ठाणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम
शुक्रवार : ऑरेंज अलर्ट – रायगड
शुक्रवार : यलो अलर्ट
पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे
शनिवार : यलो अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे








