सखल भागात पाणी तर झाडे कोसळण्याच्या घटना : मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत वाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने जनजीवन गारठले. शनिवारी दुपारपर्यंत झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. तर बेळगाव शहरालगत असलेल्या बळ्ळारी नाल्याला पुन्हा एकदा पावसाच्या पाण्याने वेढा घातल्याचे दिसून आले. काही ठिकाणी गटारी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून पाणी वाहत होते.
पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार सलामी दिली. पावसाने शुक्रवारी रात्री झोडपून काढले. रात्रभर झालेल्या पावसामुळे शहरासह तालुक्यातील अनेक भागात वीजपुरवठा ठप्प होता. त्याचबरोबर सखल भागात पाणी साचले होते. तालुक्यातील नद्या तसेच नाले पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शिवाजीनगर येथील काही भागात गुडघाभर पाणी साचले होते. त्याचबरोबर वडगाव परिसरात काही ठिकाणी गटारीचे पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे गटारी स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी मेहनत घेत असल्याचे दिसून आले. बळ्ळारी नाल्याच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आसपासच्या शेतांमध्ये पाणी साचले आहे.
वडगाव दत्त गल्ली येथे झाड कोसळले
सततच्या पावसामुळे शनिवारी दुपारी दत्त गल्ली, वडगाव येथे एक वृक्ष कोसळल्याची घटना घडली. यामध्ये एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी रस्त्यावरून कोणी ये-जा करत नव्हते. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. वीजवाहिन्यांवर हा वृक्ष कोसळल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा ठप्प होता. तुटलेल्या वीजवाहिन्या दूर करून सायंकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. महापौर मंगेश पवार यांनी घटनास्थळी पोहोचून झाड बाजूला करण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले.









