शेतवडीत पाणीच पाणी : पावसाने पूर्ण उघडीप न दिल्यास ओल्या दुष्काळाची धास्ती : शेतकरी चिंतेत
खानापूर : खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतातून पाणीच पाणी झाले असल्याने खरीप हंगामाची पेरणी वाया जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. पेरणी पूर्णपणे वाया गेली असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट उभारले आहे. जर पावसाने पुढील पंधरा दिवस पूर्णपणे उघडीप दिल्यानंतरच शेतातील कामे सुरू होणार आहेत. त्यानंतर दुबार पेरणी करावी लागणार आहे. जर पाऊस अशाप्रकारे सुरू राहिल्यास यावर्षी ओल्या दुष्काळाचे संकट उभारणार आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या उघडीपीची वाट पहात आहे.
तालुक्यात मुख्य पीक भात आहे. खरीपाच्या हंगामात तालुक्यात जवळपास 31 हजार हेक्टरवर भातपीक घेतले जाते. तालुक्याच्या संपूर्ण पश्चिम आणि दक्षिण भागात नट्टी मोठ्या प्रमाणात लावण्यात येते. तर माळजमिनीवर पेरणी करण्यात येते. यावर्षी मे महिन्याच्या मध्यापासूनच वळिवाच्या पावसाला जोरदार सुरू झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीची कामेही करता आली नाहीत. त्यानंतर अवघ्या आठ दिवसात पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी घाईगडबडीत शेतजमिनीत भाताची पेरणी केली होती. तर नट्टी लावण्यासाठी भात रोपाची पेरणी केली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले असल्याने पेरलेले भात उगवतानाच पावसाचा मारा बसल्याने तसेच उगवलेले भात पाण्याखाली कुजून गेले आहे.
खरीप हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती
पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतातील पाणी कमी झाल्यानंतर पिकांची परिस्थिती समजून येणार आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभारले आहे. जर पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यास दुबार पेरणी करता येणार आहे. तसेच नट्टीसाठी रोपांचीही उगवण योग्यप्रकारे होण्यासाठी पावसाची उघडीप गरजेची आहे. मात्र वातावरणातील गारठा आणि वारे पाहता पाऊस पुन्हा होण्याची लक्षणे दिसत आहेत. तसेच हवामान खात्यानेही पुढील काही दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे तालुक्यात यावर्षीचा खरीप हंगाम वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.









