एका तासात 3 इंच पाऊस : रस्ते अन् मेट्रो स्टेशन पाण्याखाली
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर गुरुवारी जोरदार वादळ आणि मुसळधार पाऊस बरसला. या आपत्तीनंतर न्यूयॉर्क शहर आणि न्यूजर्सीमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली. न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन डीसीपर्यंत वादळाचा परिणाम दिसून आला. न्यूयॉर्कमधील मेट्रो स्थानके भरली होती. स्थानकाच्या भिंतींमधून पाणी गळत असल्याचे दिसून आले. तसेच अनेक रस्तेही पाण्याखाली गेले होते. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी शहर आणि आसपासच्या भागात आणीबाणी जाहीर केली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने लोकांना प्रवास न करण्याचा आणि पूरस्थिती असलेल्या भागात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
मुसळधार पावसामुळे ट्रॅक पाण्यात बुडाल्यामुळे अनेक रेल्वेगाड्या आणि प्रवासी अडकले होते. बचाव पथकांनी प्रवाशांना वाचवले. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने बुडाल्यामुळे एक्स्प्रेस वे बंद करावा लागला. त्याचवेळी न्यूजर्सीमधील 14 हजारांहून अधिक लोक 24 तास विजेशिवाय राहिले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, एका तासात काही भागात 3 इंचपर्यंत पाऊस पडल्यामुळे नाले आणि नद्या ओसंडून वाहत होत्या.









