अनेक भागांना पुराचा फटका : भूस्खलनाच्याही घटना, जीवितहानीचीही नोंद
वृत्तसंस्था/ गांधीनगर, नवी दिल्ली
भयंकर मानल्या जाणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळातही सुरक्षित राहिलेल्या गुजरातमध्ये सध्या मान्सूनच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये गेल्या 30 तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सुमारे 211 तालुक्मयांमध्ये 4 ते 16 इंचापर्यंत पाऊस झाला असून बहुतांश भागाला पुराचा फटका बसला आहे. मध्य भारतातील राज्यांमध्ये पावसाची संततधार सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. पुढील 5 दिवस येथे पाऊस सुरूच राहणार आहे. 1 जुलैला मध्यप्रदेशात, 5 जुलैला पूर्व मध्यप्रदेशात, 4 आणि 5 जुलैला विदर्भासह छत्तीसगडमध्ये 5 जुलैला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर पश्चिम भारतातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने देशभरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. देशातील 20 राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ज्या राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अऊणाचल प्रदेश आदी राज्ये समाविष्ट आहेत. अनेक राज्यांमध्ये दमदार पावसाला सुऊवात झाली असून पुढील 5 दिवस ही संततधार सुरू राहणार आहे.

मध्य भारतात जीवितहानी
गुजरातमध्ये जुनागढ भागात ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. घरांपासून ते रेल्वेस्थानक आणि बसस्थानकापर्यंत पाणीच पाणी दिसत आहे. रस्त्यांवर नद्यांसारखे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पावसाशी संबंधित आपत्तींमुळे आतापर्यंत सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मध्य भारतात जवळपास 40 हून अधिक जणांचे बळी गेल्याचे आपत्ती निवारण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
गांधीधाम रेल्वेस्थानक पाण्याखाली
कच्छमधील अंजारमध्ये मुसळधार पावसानंतर पूर आला आहे. खेड्यांपासून शहरांपर्यंत सर्वत्र रस्त्यांवर वेगाने वाहणारे पाणी दिसत आहे. गांधीधाम रेल्वेस्थानक पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. जिह्यातील सखल भागात तलावासारखी स्थिती निर्माण झाल्याने बचावकार्य करावे लागले. जामनगर जिह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. गुजरातमध्ये विविध ठिकाणी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागान राज्यात पुढील 48 तासात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. अशा परिस्थितीत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्मयता आहे. अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गही पाण्यात बुडाला असून, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहने थांबली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर बसल्याने ट्रक पलटी झाल्याचेही वृत्त आहे.
गुजरातमधील नवसारी आणि तापी जिह्यात 24 तासांत 9 ते 9 इंच पावसाची नोंद झाली आहे. नवसारीत पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरांपासून रस्त्यांपर्यंत सर्व काही पाण्यात बुडाले आहे. तापी जिह्यातील वाहतूकही ठप्प झाली आहे. लोक घरात लपून बसले आहेत. अहमदाबाद जिह्यातही सुमारे 6.5 इंच पावसाची नोंद झाली आहे. अहमदाबाद शहराच्या बाहेरील प्रल्हादनगर अनेक फूट पाण्यात बुडाले आहे. येथे रस्त्यावर उभी केलेली वाहनेही पाण्यात बुडाली आहेत. मुसळधार पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची आपत्कालीन बैठक घेतली आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना घरीच सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगितले आहे.









